शिवसेनेत यादवी; विजय चौगुले यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न

नवी मुंबई शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना स्थायी समिती सदस्यपदावरून हटविण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात असलेल्या नगरसेवकांचा गट सक्रिय झाला आहे. आता चौगुले यांना विरोधी पक्षनेता पदावरून हटविण्यात यावे यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरला जात आहे. पुढील महिन्यातील सर्वसाधारण सभेपर्यंत हा बदल अपेक्षित धरण्यात आला आहे. या पदासाठी नामदेव भगत, किशोर पाटकर आणि एम. के. मढवी यांच्या नावाची चर्चा आहे. चौगुले यांना सर्वच बाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मे महिन्यात झालेल्या महापौर निवडणुकीत चौगुले यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजिनामा दिला होता. ‘मी महापौर झालो तर स्थायी समिती सदस्यपद सोडेन,’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. कोपरखैरणे येथील नगरसेवक शिवराम पाटील यांना स्थायी समिती सदस्यपदात रस आहे. भाजपाचे चार नगरसेवक फोडून महापौर निवडणुकीसाठी तयार केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौगुले यांना उमेदवारी अर्ज न भरण्याचे आदेश दिले. त्यामुळे चौगुले यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. शिवसेनेच्या उमेदवाराने मुख्यमंत्र्याचे आदेश मानल्याने चौगुले यांच्याविषयी सेनेते नाराजीचा सूर उमटू लागला होता. याचाच फायदा घेऊन त्यांचा राजीनामा मागील आठवडय़ात महापौरांकडे पाठवण्यात आला आणि सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे चौगुलेविरोधक त्यांच्या मोहिमेत यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चौगुले यांच्या स्थायी समिती सदस्यपदी अन्य शिवसेना नगरसेवकाची वर्णी लागणार आहे. चौगुले यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींत असलेल्या नाराजीचा फायदा घेऊन त्यांना आता विरोधी पक्षनेतेपदावरूनदेखील हटविण्यात यावे, अशी मागणी घेऊन नवी मुंबईतील काही नगरसेवक मागील आठवडय़ात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. त्या वेळी चौगुले हे विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय निष्क्रिय ठरल्याचे या नगरसेवकांनी शिंदे यांना स्पष्ट सांगितले.

यापूर्वी विरोधी पक्षनेतेपद एक वर्षांपेक्षा जास्त काळ देण्यात आले नव्हते. चौगुले यांना पक्षाने अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ संधी दिली आहे. त्यामुळे आता त्यांना हटविण्यात यावे यासाठी त्यांचे विरोधक एकत्र झाले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बदलाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी भगत, पाटकर, आणि मढवी या तीन नावांची चर्चा सुरू आहे.

‘चर्चा तरी करा!’

‘माझी पदे काढून घेण्यापूर्वी किमान माझ्याशी चर्चा तरी करा,’ असे आर्जव चौगुले यांनी पालकमंत्र्याना केल्याचे, माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी दोन हात केल्याची आठवणदेखील चौगुले यांनी शिंदे यांना करून दिल्याचे समजते. ‘म्हणणे ऐकून घेतले जाईल,’ असे सांगून चौगुले यांची बोळवण करण्यात आली असून त्यांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे, ‘मातोश्री’ची मूक संमती आहे, अशी चर्चा आहे. लागोपाठ दोन महत्त्वाची पदे काढून घेतल्यास चौगुले वेगळी वाट चोखाळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.