मालमत्ता प्रदर्शन; छोटय़ा घरांना अधिक पसंती

वाशी येथे चार दिवस भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनास महामुंबई क्षेत्रातील घरांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. ८० विकासकांनी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले तीनशे गृहनिर्माण प्रकल्पातील घरे व गाळे विक्रीसाठी ठेवले होते. एक लाखापेक्षा जास्त ग्राहकांनी भेट दिली तर ६०० मालमत्तांमध्ये ग्राहकांनी रस दाखविला आहे. ही खरेदीची प्रक्रिया वर्षभर सुरू राहणार असून यातून ६०० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता विकासकांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिवडी सागरी सेतूचे दुसरे टोक, मुंबई-गोवा महामार्गाचे होणारे रुंदीकरण, दिल्ली ते अलिबाग कॉरिडोअर, वसई ते अलिबाग मार्ग, नैना क्षेत्राचे नागरीकरण, गोल्फ कोर्स, नेरुळ-उरण रेल्वे आणि उरण पनवेल रेल्वेचा प्रस्ताव, अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे महामुंबई क्षेत्राला येत्या काळात एक वेगळी झळाळी येणार आहे. त्यामुळेच या भागात सरकार एक लाख कोटीपेक्षा जास्त पायाभूत सुविधांवर खर्च करणार आहे. पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरांपेक्षा दुप्पट वेगाने नागरीकरण होणाऱ्या महामुंबईत आपले स्वप्नातील घर असावे किंवा आणखी एक घर गुंतवणुकीचा परतावा म्हणून घेऊन ठेवावे या उद्देशाने अनेक ग्राहकांनी महामुंबई घर, भूखंड, वाणिज्य वापरातील गुंतवणूक करीत आहेत. निश्चलनीकरण आणि जीएसटीमुळे गेल्या वर्षी काहीसा अल्प प्रतिसाद मिळालेल्या बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई व क्रेडाईच्या वाशी येथील मालमत्ता प्रदर्शनला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बहुतांशी सर्व विकासकांनी परवडणाऱ्या घरे बांधण्यावर आपला भर दिला असून तसे प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. ३०० गृहनिर्माण प्रकल्पांपैकी ६० टक्के प्रकल्प हे परवडणाऱ्या घरांचे होते. ही घरे ऐरोली ते खालापूपर्यंत बांधण्यात येणार असून त्यांची किंमत दहा लाखांपासून ते एक कोटीपर्यंत आहे. परवडणाऱ्या घरात अलीकडे ५०० ते ६०० चौरस फुटांच्या घरांचा समावेश होऊ लागला आहे.

३६० छोटी घरे आरक्षित?

मालमत्ता प्रदर्शनाला एक लाख ग्राहकांनी भेट दिली असून ६०० मालमत्ता आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर सुरू असलेल्या या प्रकल्पात ग्राहकाचे हक्काचे घर होणार आहे. यात ३६० छोटी घरे असून १२० अल्प व तेवढीच मध्यम वर्गीयांनी आरक्षित केलेली घरे आहेत. या सर्व मालमत्ता विक्रीतून ६०० ते ६५० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.

गेली अनेक वर्षे मोठी घरे बांधणाऱ्या विकासकांनीही या वर्षी छोटय़ा घरांना प्राधान्य दिले आहे. हा आता एक ट्रेंड होणार असून चार दिवसांच्या मालमत्ता प्रदर्शनला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यातून पुढील काळात ६०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होईल, अशी अपेक्षा आहे.

– हरेश छेडा, अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई</p>