सेवादर तिपटीने वाढल्याने ग्राहकांची संख्येत घट

पनवेल : टाळेबंदीत आर्थिक संकटाची सर्वाधिक झळ बसलेला केशकर्तन व्यवसाय पुन्हा नव्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी केशकर्तनासाठी अधिक कठोर नियम लागू करण्यात आले होते. केस कापण्यासाठी कर्तनकार ग्राहकाच्या अधिक निकटच्या संपर्कात येत असल्याने वा दाढी करणे मुखपट्टी वापरण्याच्या नियमामुळे जवळपास अशक्य असल्याने या व्यवसायातील कारागिरांना कोणतीही सवलत मिळालेली नव्हती. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात टाळेबंदी उठल्यानंतर दुप्पट ते तिप्पट दराने ग्राहकांना सेवा मिळवावी लागली. त्यातही संसर्गाच्या भीतीने ग्राहकांनी केशकर्तनालयात जाण्याचे टाळले. त्यामुळे सध्या ग्राहक कमी आणि सेवादर तिप्पट असे तोटय़ाचे गणित कारागिरांना सोडवावे लागत आहे.

कठोर नियमांमुळे केशकर्तन व्यवसायात कोणतीही संधी उपलब्ध नाही. त्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ आल्याची प्रतिक्रिया केशकर्तन व्यावसायिकाने ‘लोकसत्ता’ला दिली. सध्या केशकर्तन दीडशे ते दोनशे रुपये दराने केले जात आहे. टाळेबंदीत आधीच उत्पन्न घटल्याने सध्याचे दर काहींच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यातही काही जण घरीच केस कापण्यास प्राधान्य देत असल्याने ग्राहकांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यातही काही जणांनी घरी जाऊन सेवा देण्यास सुरुवात केली. यात कारागिरांनी ५०० रुपये आकारण्यास सुरुवात केल्याने अनेकांनी या सेवेकडे पाठ फिरवली. नाभिकांनी दरनिश्चिती करताना ग्राहकांना विश्वासात घेतलेले नाही. ही एक प्रकारची आर्थिक लूटच आहे. या साऱ्या प्रकारात शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत कळंबोली येथील आत्माराम कदम यांनी व्यक्त केले.

कर्तनालयात एक कारागीर दिवसाला ३० ते ५० ग्राहकांना सेवा देत होते. मात्र, टाळेबंदीत अंतराचा नियम आणि निर्जंतुकीकरणाची जबाबदारी आल्याने त्यासाठीची खरेदी करावी लागल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे नाभिक संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.

‘२० रुपयांची वाढ ठरवली होती’

जुलैच्या अखेरीस कारागिरांना नियम आणि अटी घालून केशकर्तनालय सुरू करण्याची मुभा देण्यात आली. त्यातही काही नियम कठोरपणे पाळण्याचे आदेश होते. दाढी न करण्याच्या अटीवर कर्तनालयात केस कापण्यात यावेत. ग्राहकाकडे मुखपट्टी नसल्यास ती त्याला पुरविणे, स्वत: मुखपट्टी घालणे, चेहरा आणि डोळ्याला सुरक्षा मिळविण्यासाठी प्लास्टिक सुरक्षा कवच (शिल्ड) लावणे, अंगावर बांधण्याचे मलवस्त्र (अ‍ॅप्रन), ब्लेड, वस्तरा, कातर व इतर साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे असे नियम घालून देण्यात आले होते. यावर नवी मुंबईतील नाभिक संघटनेने या अटी पाळून व्यवसाय करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे कर्तनासाठी २० रुपयांची वाढ ठरविल्याची माहिती ‘कळंबोली नाभिक समाज असोसिएशन’चे अध्यक्ष महेंद्र कदम यांनी दिली.