केंद्र सरकारने मागील आठवडय़ात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची नियुक्ती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी केली असली तरी राज्य सरकार त्यांना कार्यमुक्त करण्यास तयार नसल्याने भाटिया यांचा सिडको मुक्काम आणखी एक-दोन महिना वाढला असल्याची चर्चा आहे. पुढील आठवडय़ात नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीची आर्थिक क्षमता स्पष्ट करणारी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. हे काम भाटिया यांनी पूर्ण करून सिडकोला अलविदा करावे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे.
राज्याच्या विक्रीकर विभागाला उत्पन्नाचे उत्तम स्रोत दिल्यानंतर राज्य सरकारने शासनाचा रखडलेला नवी मुंबई विमानतळ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाटिया यांना तीन वर्षांपूर्वी सिडकोचा कार्यभार सोपविण्यात आला होता. सनदी अधिकाऱ्याचा एका ठिकाणी दोन ते तीन वर्षे काळ झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात यावी, असा नियम आहे.
त्यामुळे भाटिया यांची या महिन्यात बदली होणार हे निश्चित होते. सिडकोने देशातील पहिल्या स्मार्ट सिटीचे नियोजन केले असल्याने देशातील इतर सर्व स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी भाटिया यांची पंतप्रधान कार्यालयात बदली केली जाणार होती. मात्र कौटुंबिक कारणास्तव भाटिया यांनी आणखी काही काळ दिल्लीत न जाता मुंबईत ठेवण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती. त्यामुळे भाटिया यांना केंद्र सरकारच्या सेवेत घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यानुसार भाटिया आणि नौकानयन सचिव यांची नुकतीच दीर्घ बैठक झाली असून त्यांनी कामकाजाची माहिती करून घेतली आहे. याच काळात राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विमानतळ उभारणीच्या टेक ऑफसाठी भाटिया यांची आवश्यकता असल्याने त्यांनी आणखी एक किंवा दोन महिने सिडकोचा अतिरिक्त पदभार सांभाळावा, अशी गळ मुख्यमंत्र्यांनी घातली असल्याचे समजते. त्यामुळे भाटिया यांच्याकडे बीपीटी आणि सिडको अशा दोन्ही संस्थांचा कारभार राहणार असून ते मुंबईतून सिडकोची सूत्रे हलविणार असल्याचे दिसून येते. या काळात सिडकोच्या दैनंदिन गतिमान कारभाराची जबाबदारी सर्वस्वी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्यावर येऊन ठेपली आहे.

विमानतळाच्या प्रकल्पासाठी..
विमानतळासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची गाडी रुळावर आणण्यासाठी सिडकोत पाठविण्यात आलेल्या भाटिया यांनी ते काम अंतिम टप्यात आणले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हावा, असे नवी मुंबईकरांना वाटत आहे. सिडकोसारख्या कुप्रसिद्ध महामंडळात काम करण्यास भाटिया तसे पहिल्यापासून इच्छुक नव्हते पण देशाचा प्रकल्प असलेल्या विमानतळाच्या प्रकल्पासाठी त्यांनी हे आव्हान स्वीकारले. तीन वर्षांतील आपल्या वेगवेगळ्या उपाययोजनेमुळे त्यांनी विमानतळाचे काम तर दृष्टिक्षेपात आणलेच पण सिडकोची प्रतिमादेखील चांगली केली, मात्र हे काम ते मुंबईतील सिडकोच्या कार्यालयातून जास्तीत जास्त करीत होते. त्यात आता त्यांचे कार्यक्षेत्रच मुंबई झाल्यामुळे नवी मुंबईत येण्याचा प्रश्न शिल्लक राहिला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही मुंबईत ये-जा करावी लागत आहे. त्याऐवजी सिडकोचा पदभार असेपर्यंत तरी निदान सिडकोचे मुख्यालय असलेल्या बेलापूर येथे काही काळ उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.