23 February 2019

News Flash

शालेय विद्यार्थ्यांना ‘फोल्ड बॅग’ची नवलाई

एकाच दप्तराला नवनवीन रूपे देण्याची सोय

|| पूनम धनावडे

एकाच दप्तराला नवनवीन रूपे देण्याची सोय

नवीन दप्तर, त्यात नवी कोरी वह्य़ा-पुस्तके, कर्टूनच्या चित्रांनी सजलेली कंपासपेटी, रंगीबेरंगी डबा-पाण्याची बाटली.. अशा सगळ्या नव्या-नव्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आई-बाबांचे बोट पकडून आलेल्या लहान मुलांची सध्या बाजारात झुंबड उडाली आहे. बहुतेक शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्यामुळे शालेय साहित्याच्या नवलाईने बाजारपेठा सजल्या आहेत. वेगवेगळ्या कार्टून्सच्या चित्रांची फोल्ड बॅग यंदा भाव खात आहे.

वाशीतील होलसेल बाजारात सध्या ग्राहकांची झुंबड उडाली आहे. यंदा शालेय वस्तूंच्या किमतीत वाढ झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ग्राहकांनी चिनी बनावटीच्या वस्तूंकडे पाठ फिरवली असून ब्रँडेड किंवा भारतीय बनावटीच्या शालेय साहित्याला प्राधान्य दिले जात असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

यंदा एका नवीन प्रकारातील फोल्ड बॅग बाजारात आली आहे. ही बॅग इतर दप्तरांसारखीच आहे, परंतु यात एकाच वेळी मुलांना वेगवेगळ्या कार्टून्सची चित्रे पाहता येणार आहेत. नेहमीच्या दप्तराच्या दर्शनी भागात एकच कार्टूनचित्र असते. फोल्ड बॅगमध्ये एकाच वेळी तीन वेगवेगळी चित्रे आहेत. डोरेमोन, स्पायडरमॅन, डिस्नी, बार्बी डॉल अशी चित्रे असलेली तीन फोल्ड आहेत. जेव्हा हवे तेव्हा यापैकी एक चित्र दर्शनी भागात ठेवता येणार आहे. या दप्तराची किंमत ७०० ते १००० रुपये आहे. भारतीय बनावटीच्या या दप्तरासाठी सहा महिन्यांची वॉरन्टीही देण्यात येते. त्यामुळे पालकही हे दप्तर घेण्यास सहज तयार होतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ट्रॉली बॅगला अधिक मागणी होती, ही बॅग ४०० ते ७०० रुपयांत उपलब्ध आहे.

शालेय साहित्याच्या किमतीत वाढ झालेली नाही. ब्रँडेड वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. यंदा नवीन डिझाइनमध्ये भारतीय बनावटीच्या जादा टिकाऊ  आणि आकर्षक वस्तू देखील उपलब्ध झाल्या आहेत.      – विनोद शर्मा, विक्रेता, वाशी

First Published on June 12, 2018 12:50 am

Web Title: school bag