शाळेत विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रत्येक शाळेत तक्रारपेटी असणे बंधनकारक आहे, मात्र नवी मुंबईतील अनेक शाळांनी हा नियम धाब्यावर बसवला आहे.

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर्शनी भागात तक्रारपेटी ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तशा नोटिसाही सर्व शाळांना पाठवण्यात आल्या आहेत, मात्र काही शाळांनी अद्याप तक्रारपेटय़ा बसवलेल्या नाहीत.

नवी मुंबईत एकूण ४२४ शाळा आहेत. त्यापैकी महानगरपालिकेच्या प्राथमिक ५३ तर माध्यमिक १७ शाळा आहेत. यापैकी कोपरखैरणे आणि वाशी येथील काही शाळांत तक्रारपेटी नाही. वाशीतील महापालिका शाळा क्रमांक २८मध्ये आधी तक्रारपेटी लावण्यात आली होती, परंतु आता ती तिथे नाही, असे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच आयसीएल विद्यालयातील तक्रारपेटी शाळेच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने काढण्यात आली आहे. तसेच कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयात अद्याप तक्रारपेटी बसविण्यात आलेलीच नाही. परंतु लवकरच तक्रारपेटी बसवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

तक्रारपेटीबाबतचा अध्यादेश मे महिन्यात काढण्यात आला होता. जूनपासून प्रत्येक शाळेत त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली होती.

शासनाचा जीआर येताच आम्ही पालिका आणि खासगी अशा सर्व शाळांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार एखादी तक्रार दाखल झाल्यास त्यावर आम्ही कारवाई करू.

संदीप सांगवे, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका.