नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात महापालिका शाळेचे गेट अंगावर पडल्याने पाचवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सौरभ चौधरी असे या विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेत त्याचा मित्र देखील जखमी झाला आहे.

कौपरखेरणे परिसरात राहणारा सौरभ चौधरी हा रा. फ. नाईक या शाळेत  पाचवी इयत्तेत शिकत होता. शुक्रवारी सकाळी सौरभ आणि त्याचा मित्र निलेश हे दोघे शाळेच्या नवीन इमारतीच्या गेटजवळ खेळत होते. यादरम्यान मुख्य प्रवेशद्वारावरील सरकते गेट सौरभच्या अंगावर पडले. यात गंभीर जखमी झालेल्या सौरभचा मृत्यू झाला. तर निलेशचा पाय या घटनेत फ्रॅक्चर झाला आहे.

महापालिकेने ४० कोटी रुपये खर्च करुन शाळेची इमारत बांधली असून जूनमध्ये शाळा सुरु होणार होती. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडल्याने इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.