15 October 2019

News Flash

शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

शाळकरी मुलींवर अत्याचार होण्याची ही उरणमधील दुसरी घटना उघडकीस आली आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

कळंबुसरे गावातील धक्कादायक घटना

उरण : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अल्पवयीन शाळकरी मुलीवर शाळेतील स्थानिक शाळा समितीच्या पदाधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात घडली असून याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका राजकीय पक्षाचा गाव अध्यक्ष असलेल्या नारायण पाटील (४०) याच्यावर पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

अशा प्रकारे आठ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सोमवारी रात्री ग्रामस्थांना व मुलांच्या पालकांना याची माहिती मिळताच त्यांनी उरण पोलीस ठाणे गाठत लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार उरण पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अशाच प्रकारची घटना २०१३ मध्ये मोठीजुई गावातील प्राथमिक शाळेत घडली होती. याप्रकरणी शिक्षकाला शिक्षाही झाली होती. तर कळंबुसरे येथे झालेल्या या घटनेमुळे उरण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

या नराधमाने शाळेतच या अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार शाळेतील मुलांनी खिडकीतून पाहिल्याने त्यांनी याबाबतची माहिती खिचडी शिजविण्यासाठी असलेल्या महिलेला दिली. त्यानंतर पालकांना माहिती मिळाल्यावर मुलीच्या पालकांसह गावातील कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी करीत  कळंबुसरे मधील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने जमा झाले.

शाळकरी मुलींवर अत्याचार होण्याची ही उरणमधील दुसरी घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता,  पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले असल्याचे सांगितले.

या घटनेमुळे उरणमधील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगाराला कठीणातील कठीण शिक्षा करण्यात यावी अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र सचिव हेमलता पाटील यांनी केली आहे. तसेच महिलांवर व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा त्यांनी निषेध केला. या घटनेनंतर पोलिसांकडून शाळेतील मुख्याध्यापिकेसह इतरांचीही चौकशी केली जात आहे, तर गावातही तणावाचे वातावरण पसरलेले आहे.

First Published on April 17, 2019 3:40 am

Web Title: school girl sexual harassment by committee official