स्थायी समिती सदस्यांची मागणी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जुलै अखेपर्यंत शालेय साहित्य देण्यात यावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी बुधवारी केली. शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. मागील वर्षी काही तांत्रिक कारणांमुळे वर्ष उलटून गेले तरी गणवेश देण्यात आला नव्हता. अनेक विद्यार्थ्यांचे बँक  खातेही उघडण्यात आले नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येते, मात्र त्या रकमेतून शालेय साहित्याची खरेदी केली गेली की नाही, याची खातरजमा करून घेतली जाते का, याबाबत प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य विजय चौगुले आणि नामदेव भगत यांनी केली. अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांना प्रशासकीय कामकाजाची माहिती नसते. त्यामुळे सर्व मुख्यध्यापकांना पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शालेय कामकाज नियमावलीविषयी मार्गदर्शन करावे. माहितीपर चर्चासत्रांचे आयोजन करावे, अशी सूचनाही चौगुले यांनी केली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी काही तांत्रिक कारणांमुळे दप्तर व गणवेश मिळाला नाही. संपूर्ण शैक्षणिक वर्ष संपल्यांनतरही प्रशासनाने अद्यापही तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महानगरपालिकेच्या शाळांमधील २९ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे २१ हजार विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडण्यात आली आहेत. मात्र त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर लवकरच सर्व विद्यार्थ्यांची बँकेची खाती उघडणे, शालेय गणवेशवाटप, दप्तरवाटप, रेनकोट आदी साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीच्या सदस्यांनी शिक्षणधिकारी संदीप सांगवे यांनी सांगितले.

ठोक मानधनावरील सर्व शिक्षकांना मानधन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ठोक मानधन तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या आणि न्यायालयात गेलेल्या शिक्षकांना मानधन देण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आणि शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाच्या निकषांनुसार मानधन देणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले .

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठ नोडमधील शाळांमध्ये १२० प्राथमिक शिक्षक ठोक मानधन तत्त्वावर कार्यरत होते. त्यापैकी ७१ शिक्षकांनी समान काम समान वेतन श्रेणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात सादर केलेल्या प्रमाणपत्रानंतर सर्व शिक्षकांना ठोक मानधन तत्त्वानुसार मानधन देण्यात येत नव्हते. ठोक मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले कार्य पाहता आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक प्रगती पाहता ठोक मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना मानधन देण्याच्या निर्णयाचे स्थायी समिती सदस्यांनी स्वागत करताना मानधन देण्यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील ठोक मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयीन आदेशाला धक्का न लावता संपूर्ण १२० कर्मचाऱ्यांना मानधन देण्यावर विचार करून लवकरच त्यांची पूर्तता करण्यात येणार आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त