प्रादेशिक परिवहन विभागाच्या मुख्याध्यापकांना सूचना
शाळा महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शाळा महाविद्यालयाने वर्ग भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत अर्धा ते एक तासाचा बदल करण्याच्या सूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी ख्याध्यापकांच्या बैठकीत केल्या.
वाशी आणि कोपरखरणे भागातील शाळा-महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या पालकांची वाहने मोठय़ा प्रमाणात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक होते. याबाबतच्या तक्रारी वाहतूक विभागाकडे नागरिकांकडून करण्यात येत आहे. अपघात होण्याची शक्यता असल्याने ही समस्या सोडविण्याच्या उद्देशाने नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने सोमवारी वाशीतील फादर अ‍ॅग्नेल महाविद्यालयाच्या सभागृहात कोपरखरणे व वाशी विभागातील सर्व शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्याची बैठक घेतली. यावेळी वाशी विभागातील १२ आणि कोपरखरणे विभागातील १५ शाळा आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य उपस्थित होते.
मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना साळवे म्हणाले की, वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व शाळा व महाविद्यालयाने आपसात त्यांचे वर्ग भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत अर्धा ते एक तासाचा बदल करण्याबाबतच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे सर्व शाळांमधील स्कूल बस शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार चालविण्यात याव्यात. स्कूल बससंदर्भात पालकांच्या बैठकीचे आयोजन करण्याचे तसेच या बैठकीत वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना बोलवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शाळा महाविद्यालयाबाहेरील इतर काही समस्या असल्यास त्या त्वरित ई-मेलद्वारे कळविण्याबाबत त्यांनी आवाहन केले. तसेच यावेळी वाशी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश बापशेट्टी व कोपरखरणे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक आगीवले यांनी वाहतुकीच्या समस्या मांडल्या.