अतिदक्षता खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय

नवी मुंबई : शेजारच्या ठाणे पालिका क्षेत्राने दिवसाला दोन हजार करोना रुग्णांचा आकडा पार केल्याने नवी मुंबई पालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. करोना काळजी केंद्रे, उपचार रुग्णालये आणि अतिदक्षता रुग्णशय्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईत सध्या सरासरी दैनंदिन दीड हजार रुग्णसंख्या असून घरात विलगीकरण झालेले आठ हजार रुग्ण आहेत. शहरातील काही बडय़ा खासगी रुग्णालयांचा साठ टक्के ताबा हा शहराबाहेरील रुग्णांनी घेतला असल्याने स्थानिक रुग्णांना रुग्णशय्या कमी पडत आहेत. करोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने करोना उपचार रुग्णालयापेक्षा कोविड काळजी केंद्राची संख्या जास्त आवश्यक आहे. त्यासाठी जवळच्या पनवेल पालिका क्षेत्रातील खारघर उपनगरातील तीनशे खाटा असलेली दोन वसतिगृहे आणि वाशी येथील काही खासगी व पालिका शाळा, महाविद्यालये ताब्यात घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

नवी मुंबईत करोना रुग्णस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जमावबंदी व संचारबंदी लागू केल्यानंतर एक हजार ५००च्या जवळपास गेलेली रुग्णसंख्या दोन दिवसांत बाराशेपर्यंत मर्यादित आहे. मात्र शेजारच्या शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आज ना उद्या नवी मुंबईत ही संख्या झपाटय़ाने वाढण्याची भीती प्रशासन व्यक्त करीत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला उपचार उपलब्ध करण्यासाठी पालिका प्रशासन अनेक उपाययोजना करीत असून बंद करण्यात आलेली करोना काळजी केंद्रे नव्याने सुरू करण्यात आली आहेत. यात तुर्भे येथील निर्यात भवन व सत्संग सभागृह सुरू करण्यात आले आहे. याशिवाय वाशी येथील कोविड काळजी केंद्रात अत्यवस्थ रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दोनशे खाटा या अत्यवस्थ रुग्णांसाठी राखीव असून रुग्णसंख्या वाढल्यास त्यांना आणखी शंभर खाटा अत्यवस्थ रुग्णांना तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दैनंदिन रुग्ण वाढत असल्याने काळजी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालये बंद असल्याने मोकळी असलेली खारघरमधील दोन वसतिगृहे ताब्यात घेऊन तेथील खाटा रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वाशी, बेलापूर व ऐरोली या तीन भागात काही पालिका व खासगी शाळा ताब्यात घेऊन त्या ठिकाणीही कोविड काळजी केंद्र उभारण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे.

 

खाटांची सद्य:स्थिती

केंद्राचे नाव                                          खाटांची संख्या            रुग्णसंख्या

आगरी कोळी भवन                                    ६०                                 ५०

वाशी सेक्टर १४, समाजमंदिर                     १०८                               ९०

अण्णासाहेब पाटील भवन, कोपरखैरणे       १००                               २६

एमजीएम सानपाडा                                    ७५                                 ७५

लेवा पाटीदार समाज                                   ३०२                              ००

राधास्वामी सत्संग आरोग्य सुविधा केंद्र       ३६३                              २९९

निर्यात भवन आरोग्य सुविधा                      ३१६                               २८६

ईटीसी केंद्र, वाशी                                          १८०                              १२०

जानकीबाई मढवी सभागृह                             ६६                               ००