सीवूड्स ते खारकोपर मार्गावर नुकतीच लोकलची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. दिलेल्या मुदतीत म्हणजेच डिसेंबर २०१७ पर्यंत ही लोकल सेवा सुरू होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

नवी मुंबईचा एक भाग असलेल्या उरणला जोडणाऱ्या नेरूळ-सीवूड्स ते उरण दरम्यानच्या लोकलची घोषणा १९९७ मध्ये करण्यात आली होती. भू-संपादनासह विविध कारणांमुळे हा प्रकल्प २० वर्षे रखडला होता. यातील सीवूड्स ते खारकोपर दरम्यानचा लोकलचा पहिला टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. सिडकोच्या उलवे तसेच द्रोणागिरी नोडचा विकास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे उलवे नोड परिसरातील नागरीकरण वाढू लागले आहे.

येथील रहिवाशांना नवी मुंबई तसेच मुंबईला ये-जा करण्यासाठी दळणवळणाची सोय नाही. बससेवा उपलब्ध आहे; मात्र ती अपुरी पडते. त्यामुळे रहिवाशांना खासगी सेवेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सिडकोच्या आराखडय़ात नेरूळ, सीवूड्स दारावे, सागर संगम, तरघर, बामण डोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावा शेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी व उरण ही स्थानके असलेल्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. उरणमधील औद्योगिकीकरणामुळे ५०-७५ हजार कामगार उरणमध्ये ये- जा करतात. बसमध्ये त्यांचीच प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. वारंवार मुदत देऊनही हा रेल्वेमार्ग रखडला आहे. उलवा तसेच द्रोणागिरीमधील विकासालाही खीळ बसली आहे.

या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मागील आठवडय़ात या मार्गावर रेल्वेने लोकलची चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाली. सिडकोने स्थानिकांची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत ही कामे पूर्ण होऊन डिसेंबर २०१७ पर्यंत लोकल सुरू होईल.

– डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको