पक्ष्यांची शिकार टाळण्यासाठी पाणजे डोंगर, जेएनपीटी परिसरात वन विभागाचा पहारा

उरणमधील पाणजे डोंगर तसेच जेएनपीटी बंदर परिसरात दरवर्षी परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढू लागली आहे. उरणमधील पाणथळींवर येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची शिकार झाल्याच्या घटना यापूर्वी उरणमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे या परदेशी पाहुण्यांना सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी उरणच्या वन विभागाने सकाळी व सायंकाळी पाणथळींच्या परिसरात गस्त वाढवली आहे. हे थवे पाहण्यासाठी पक्षिप्रेमी, निरीक्षक, अभ्यासक छायाचित्रकार आणि पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

मुंबई व नवी मुंबईप्रमाणे उरणमधील पानथळींवर विविध प्रजातींचे परदेशी पक्षी दरवर्षी येतात. त्यापैकी काही प्रजातींचे पक्षी पुढे वर्षभर वास्तव्य करतात. दरवर्षी या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या वर्षीही मोरा व जेएनपीटी बंदराच्या मध्यभागी असलेल्या पाणजे गावाजवळ समुद्रकिनाऱ्यावर या परदेशी पक्ष्यांचे थवे उतरले आहेत. गुलाबी रंगाच्या रोहित पक्ष्यांचे आकर्षक थवे कॅमेऱ्यात टिपण्यासाठी छायाचित्रकार गर्दी करत आहेत.

२०१० मध्ये न्हावा शेवा पोलीस ठाण्यासमोर रोहित पक्ष्यांची बंदुकीच्या गोळ्या झाडून शिकार करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये डोंगरी, फुंडे परिसरांतही मृतावस्थेतील रोहित पक्षी आढळले होते. त्यामुळे या पक्ष्यांची शिकार होत असल्याचे उघड झाले. या पक्ष्यांच्या संरक्षणाची मागणी पक्षिप्रेमींनी वारंवार केली होती. त्यानुसार वन विभागाने या परिसरात सूचना देणारे फलक लावले आहेत. याच परिसरात उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचा धक्का बसून या पक्ष्यांना अपघात झाला होता.

या स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वन विभागाच्या गस्ती वाहनातून सकाळी व सायंकाळी पाणथळीवर पहारा देण्यात येत आहे.

बी. डी. गायकवाड, उरण, वनसंरक्षक