ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी कवळ तीन रुग्णालये; खासगी रुग्णालयांची नोंदणीच नाही; दिवसभरात केवळ ४९ जणांना मात्रा

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई :  करोना प्रतिबंधासाठी केंद्र सरकारने सोमवारी, १ मार्चपासून सुरू केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबई महापालिकेच्या न-नियोजनाचा फटका नागरिकांना बसला. ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी नागरिकांच्या लसीकरणासाठी पालिकेने संपूर्ण शहरात तीनच रुग्णालये निश्चित केली असून सोमवारी दिवसभरात याठिकाणी जेमतेम ४९ जणांचेच लसीकरण होऊ शकले. दुसरीकडे, राज्य शासनाकडून निर्देश आले नसल्याचा दावा करत पालिकेने खासगी रुग्णालयांची नोंदणीही केलेली नाही. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया काही दिवस संथगतीनेच सरकण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी नागरिकांचे लसीकरण सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमांत माहिती प्रसारित झाल्याने सोमवारी पहिल्या दिवशी लशीची पहिली मात्रा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, ‘कोविन अ‍ॅप’मधील त्रुटी आणि नवी मुंबई महापालिकेचा गोंधळ यांमुळे त्यांचा हिरमोड झाला.

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शहरात सावळागोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालिकेच्या तीन रुग्णालयांपैकी नेरुळ व वाशी येथील रुग्णालयात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा प्रारंभ झाला, परंतु खासगी रुग्णालयाची पोर्टलवर नोंदच न झाल्याने शहरात लसीकरणाबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र होते.  खासगी रुग्णालयाची पोर्टलवर कोल्ड चेन पॉइंट निर्माण होणे आवश्यक आहे, परंतु ही प्रक्रियाच पोर्टलवर न झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

खासगी रुग्णालयात तिसऱ्या टप्प्यातील ११ रुग्णालयांत हे लसीकरण होणार आहे, परंतु पोर्टलच्या गोंधळामुळे शहरातही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे खासगी रुग्णालयातील लसीकरणाबाबत पोर्टलवर नोंद होणे त्यानंतर तेथील लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, परंतु ते गोंधळामुळे शक्य न झाल्याने पालिकेने मंगळवारी खासगी रुप्णालयात निश्चित करण्यात आलेल्या रुग्णालयात प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी  दिली.

आज सर्वत्रच गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. परंतु प्रशासकीय गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिकांचा मात्र गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दोन ठिकाणी  तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण करण्यात आले. तसेच खासगी रुग्णालयातील नोंदणी प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने त्याठिकाणी लसीकरण करण्यात आले नाही. पहिल्या दिवशी खासगी रुग्णालयात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण करण्यात येऊ  नये, असे राज्य शासनाचे निर्देश होते.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका