उरण शहरातील मोरा रस्त्यावर असलेल्या पेन्शनर्स पार्कमधील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी असलेली बाके व येथील प्रवाशांसाठी असलेल्या बस स्थानकाचे दोन शेड मागील सहा महिन्यापासून गायब झाले असून वाढत्या उन्हाचा तडाखा लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पेन्शनर्स पार्कमध्ये बाके तसेच बस स्थानक शेडची उभारणी करण्याची मागणी उरण तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेने उरण नगरपालिकेकडे केली आहे. मात्र बाकांच्या किमतीत वाढ झाल्याने बाकांसाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उरणमधील ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीची जागा म्हणून उरण नगरपालिकेने उरण मोरा रस्त्यावर पेशर्न्‍स पार्क जाहीर केले आहे. पूर्वी या ठिकाणी असलेल्या फलकाजवळ सिमेंटची बाके होते.या बाकांवर बसून ज्येष्ठ नागरिक विश्रांती घेत असत. सध्या या पार्कजवळ एनएमएमटीचे बस स्थानक आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही सोय होत होत. त्याचप्रमाणे दोन बस स्थानकेही होती. मात्र सहा महिन्यापूर्वी येथील बाके व बसस्थानकाचे शेडही काढण्यात आलेले आहे.स्थानकात पंधरा मिनिटाला एक बस येते. मात्र सध्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अर्धा ते पाऊण तासांनी बसेस येऊ लागल्या आहेत.त्यामुळे वाट पाहून व उन्हामुळे हैराण झालेल्या प्रवाशांना साधी बसण्याची सोय उपलब्ध नाही.त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.नगरपालिकेने पेन्शर्स पार्कमध्ये यापूर्वी सिमेंटची बाके लावलेली होती, तसेच प्रवाशांसाठी बसस्थानकही अस्तित्वात होते. मात्र बसस्थानकाचा वापर हा सायकल पार्किंगसाठीच केला जात होता. या दोन्ही गोष्टी मागील अनेक महिन्यांपासून गायब झाल्याने ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे बाकांची तसेच प्रवाशांसाठी शेडची व्यवस्था करण्याची मागणी नगरपालिकेकडे केल्याची माहिती संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश काटदरे यांनी दिली.