‘शोर’ चित्रपटातील ‘एक प्यारका नगमा है’ या गाण्याची चर्चा

लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : सध्या समाजमाध्यमांवर पनवेलमधील एका अवलिया पोलीस अधिकाऱ्याने ‘शोर’ चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले ‘एक प्यारका नगमा है’ या गाण्याची चर्चा जोरात आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी रविवारी हे गाणे पुणे येथील एका स्टुडिओत जाऊन ध्वनिमुद्रित केले. गेल्या २० तासांत १२०० जणांनी हे गाणे पाहिले आणि ऐकले.

पोलीस खात्यातील नोकरी म्हणजे गुन्हेगारीशी लढाई. रुक्ष कार्यपद्धती हा त्यातील एक भाग. परंतु, गायकवाड यांनी या खात्यात कर्तव्य बजावताना स्वत:मधील हळवा कोपरा कायम जिवंत ठेवला. आठ तासांच्या ‘डय़ुटी’तून सैलावल्यावर गाण्याचा रियाज होताच. पण तरीही ही कला सादर करण्याची संधी मिळाली नाही. ती गायकवाड यांनी वयाच्या ५४व्या वर्षी साधली. त्यांच्या गोड गळ्याचे सध्या पोलीस दलात कौतुक आहे.

बारामती येथे शालेय शिक्षण आणि मग टी. सी. महाविद्यालयात पदवी शिक्षण झाले. बालपणीच त्यांच्यात गानकळा विकसित होऊ लागली. शाळेत प्रार्थना सुरात गाणारा विद्यार्थी असा त्यांचा लौकिक होता. त्यानंतर त्यांनी गाणं फक्त मनातच ठेवलं आणि पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांनी पोलीस दलात आजवर अनेक सन्मान मिळविले आहेत.जनजागृती करण्यासाठी भोंग्यावरून त्यांनी अनेक सूचना ‘स्वरबद्ध’ केल्या. करोनाकाळात एका हवालदाराचा वाढदिवस साजरा करताना त्यांनी माइक घेऊन गाणे सादर केले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गाणे ध्वनिमुद्रित करण्यासाठी आग्रह धरला. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून गायकवाड यांच्याकडून स्टुडिओत गाणे गाऊन घेतले.