भाजपचे सहा आजी-माजी नगरसेवक अजित पवार यांच्या भेटीला

नवी मुंबई :  माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या ४९ नगरसेवकांपैकी चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असतानाच आणखी तीन नगरसेवक आणि तीन माजी नगरसेवकांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन स्वगृही परतण्याचे संकेत दिले.

याशिवाय  आणखी सात नगरसेवक महाविकास आघाडीतील घटक पक्षांत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवारांनी नाईकांच्या गडाला सुरुंग लावल्याची चर्चा आहे.

नाईकांनी पुत्रप्रेमापोटी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ४९ नगरसेवक भाजपमध्ये  गेल्याने पालिकेत २० वर्षे असलेली राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्तेमुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना स्वगृही येण्याचे वेध लागले आहेत. गेल्या आठवडय़ात तुर्भेतील एका नगरसेवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याचे संकेत दिले. त्यानंतर गुरुवारी माजी सभापती शुभांगी पाटील यांनी नेरुळ, तुर्भे, वाशी येथील पाच आजी माजी नगरसेवकांसहित अजित पवार यांची भेट घेतली आहे.

कोपरखैरणे व घणसोली या  माथाडी कामगारांचे वर्चस्व असलेल्या  भागातील चार नगरसेवकही राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता असून, ते राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या संपर्कात आहेत. दिघा परिसरातील तीन नगरसेवक ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.