वाशीतील घटना : आरोपींकडून ८० लाख रुपये हस्तगत

कुरियरच्या बहाण्याने व्यापाऱ्याच्या घरात घुसून दोन कोटी ९ लाख ३६ हजारांचा ऐवज लुटल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून ८० लाख, ८० हजार ५६७ रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये पोलीस हवालदाराच्या पत्नीचा समावेश असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अनिता मुकुंद म्हसाणे, सुभाष श्रीधर पाटील, खुशी जिब्राईल खान, सनी सुहास शिंदे, शंकर रामचंद्र तेलंगे, जिब्राईल गयाऊद्दीन खान ऊर्फ मुन्ना, फिरोज अब्दुल रेहमान शेख अशी या आरोपींची नावे आहेत. त्यातील अनिता ही खांदेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार मुकुंद म्हसाणे यांची पत्नी आहे. अनिता म्हसाणे व एपीएमसी बाजारातील भाजीपाल्याचे व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्यात काही आर्थिक व्यवहार होता. त्या वादातून अनिता हिने मेनकुदळे यांच्या घरी दरोडा टाकण्याची योजना आखली, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. कुरियरच्या बहाण्याने मेनकुदळे यांच्या वाशी सेक्टर १७ येथील घरावर २७ ऑक्टोबरला सहा जणांनी दरोडा टाकला. मेनकुदळे यांच्या पत्नी व मुलीला बंदुकीचा धाक दाखवून रोख रक्क्म व सोन्या-चांदीचे दागिने असा २ कोटी ९ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी लुटला. या प्रकरणी पोलिसांनी ९ तपास पथके तयार केली होती. अन्य तीन आरोपी फरार असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला.