फेब्रुवारीमध्ये बंदरातून २४ टन तांब्याच्या सळ्या आयात करण्यात आल्या होत्या. हा ७९ लाख रुपये किमतीचा माल गुजरात येथे नेण्यासाठी मालवाहक कंटेनरवरून घेऊन जात असताना त्याची चोरी करण्यात आलेली होती. याची तक्रार उरण पोलिसात नोंदवली होती.पोलिसांनी केलेल्या तपासानंतर सुरतमधून हा माल हस्तगत करण्यात आला आहे. या चोरी प्रकरणात मालासह कंटेनर व वाहन असा एकूण ८३ लाखांच्या मालासह सात जणांना उरण पोलिसांनी अटक केली आहे.
संध्या कंटेनर अ‍ॅण्ड मूवर्स ट्रान्सपोर्टच्या राजेश राजभर यांच्या ताब्यात दमण येथील पॉलीकॅप वायर्स प्रायव्हेट लिमिटेडची तांब्याची सळ्या नेण्यासाठी दिल्या होत्या. कारगील यार्डमधून हा माल भरण्यात आला होता. मात्र तो माल कंपनीच्या दमण येथील ठिकाणावर न नेता तो गुजरातच्या सुरत भागात चोरी करून नेण्यात आला होता अशी तक्रार राहुल खाडे यांनी उरण पोलिसात केली होती. या प्रकरणी उरण पोलिसांनी केलेल्या तपासानंतर मनोजकुमार शर्मा (५२) नाहुर मुंबई, प्रकाश अमृतभाई ओरा (जैन) ४७, गुजरात, सर्वनंदा ऊर्फ राजू रामगज शुक्ला (३९)सुरत, विनोदभाई चंद्रमणी तिवारी (३२)चंद्रपूर, विवेक भाई इंद्रमणी तिवारी(२६), अरुणकुमार नरेंद्रनाथ शुक्ला (४०) उत्तर प्रदेश, प्रदीपभाई नरेंद्रभाई शुक्ला (३६)गोरखपूर यांना ७९ लाख १५ हजार ९६८ रुपयांचा माल तसेच ३ लाख ८० हजारांच्या कंटेनर व वाहनासह अटक केल्याची माहिती तपास अधिकारी बी. एम. आव्हाड यांनी दिली आहे.