कायम सेवेत असलेल्या ११०० कर्मचाऱ्यांना लाभ

संतोष जाधव

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना वर्षभरापूर्वीच सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर परिवहन उपक्रमही पालिकेचाच भाग असल्याने परिवहन कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी नवी मुंबई महापालिका कर्मचारी कामगार सेनेने केलेली होती. अखेर ही मागणी मान्य झाली आहे. या वेतन आयोगामुळे कायम सेवेत असलेल्या परिवहनच्या जवळजवळ ११०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

नवी मुंबई महापालिका ही आस्थापनावर सर्वात कमी खर्च करणारी महापालिका आहे. शासनाच्या नियमानुसार त्या त्या सरकारी आस्थापनांनी कमीत कमी ३५ टक्कय़ांपर्यंत आस्थापना खर्च करण्यास हरकत नाही. परंतु नवी मुंबई महापालिकेत आस्थापनावर शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षाही कमी खर्च होतो. त्यामुळे पालिकेच्या विकासात्मक कामांना अधिकाधिक खर्च करता येतो. त्यामुळे  महापालिकेचा आर्थिक ताळेबंदाचा विचार करता पालिका कर्मचाऱ्यांना राज्यशासनाच्या          मान्यतेने सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्याच परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग मिळावा यासाठी नवी मुंबई महापालिका कर्माचारी सेना युनियनचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, तसेच परिवहन सदस्य समीर बागवान तसेच युनियन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्यावर्षी पालिका प्रशासनाने प्रशासकीय सेवांच्या खर्चासाठी ५३१ कोटी ७१ लाखांची तरतूद केली होती. यावर्षीच्या अंदाजपत्रकात प्रशासकीय सेवा खर्चाची तरतूद १०६ कोटी ९८ लाखाने वाढवून ६३८ कोटी ६९ लाखांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यामुळे प्रशासकीय सेवांसाठी वाढवण्यात आलेली तरतूद ही पालिकेतील कर्मचऱ्यांना लागू करण्यात आलेल्या ७ व्या वेतन आयोगासाठी असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली होती. त्यामुळे वाढीव प्रशासकीय खर्चातील रक्कम परिवहनला देण्याची मागणी होऊ लागली होती. त्यामुळे महापालिकेत कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला असल्याने परिवहन कर्मचाऱ्यांनाही तात्काळ आयोग लागू करण्याची मागणी आता शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे.
परिवहन उपक्रम हा नवी मुंबई महापालिकेचाच भाग असून पालिका कर्माचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग शासनाने मंजूर केला असून परिवहन कर्मचाऱ्यांनाही तो मिळालाच पाहिजे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि प्रशासनाकडे याबाबत मागणी करण्यात येत होती. त्याला यश मिळाले असून कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
– शहाजी शिंदे, महापालिका कर्मचारी कामगार सेना

शासनाने नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला सातवा वेतन आयोग लागू केला असून लवकरच याबाबत वेतननिश्चिती करण्यात येईल. या वेतन आयोगाचा परिवहनच्या कायम सेवेतील जवळजवळ ११०० कर्मचाऱ्यांना लाभ होईल.

– शिरीष,आरदवाड, परिवहन व्यवस्थापक 

परिवहन कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी सातत्याने युनियनच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला होता. वेतन आयोग लागू झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

– विजय नाहटा, अध्यक्ष, नवी मुंबई मनपा कर्मचारी कामगार सेना