दोन ठेकेदारांचा प्रतिसाद; अंतिम निर्णय प्रलंबित

नवी मुंबई : शहराच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव गेले वर्षभर निविदा प्रक्रियेत अडकला आहे. प्रतिसाद मिळत नसल्याने पालिका प्रशासनाने नुकतीच यासाठी सातवी मुतदवाढ दिली आहे.

सद्य:स्थितीत नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून मुख्य ठिकाणी २८२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु यातील काही नादुरुस्त आहेत, तर काहींची क्षमता कमी असल्याने शहराच्या सुरक्षेसाठी सर्वच मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून यासाठी १५४ कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून १८ जानेवारीला ७ वी अंतिम मुदवाढ संपली असून यात फक्त दोन निविदाकारांनी प्रतिसाद दिल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. आता नव्याने निविदा काढणार की आलेल्या ठेकेदारांना काम देणार, याबाबत अद्याप पालिका प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

महापालिका हद्दीतील महत्त्वाची निवडक ठिकाणे, शहरातील प्रवेशद्वारे, मुख्य चौक, मार्केट, बस डेपो, रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर तसेच वर्दळीच्या ठिकाणी देखरेखेसाठी पालिकेने २०१२ या वर्षांत २७२ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कामाला मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ  देण्यात आली आहे. परंतु आयटी उपकरणे यांचे आयुर्मान पाच वर्षे निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्याची उपकरणे ही कालबा झाली आहेत. त्यामुळे सध्या कार्यान्वित असलेले सीसीटीव्ही कालबा झाले आहेत. त्यामुळे नवीन प्रस्तावानुसार शहरात १४३९ अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मात्र तत्कालीन आयुक्त मुंडे यांच्या कार्यकाळात आलेला हा प्रस्ताव अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळे शहरात सीसीटीव्ही बसणार तरी कधी, असा सवाल होत आहे.

देन निविदा आल्या असून नियमानुसार दोन निविदा आल्यानंतरही काम निश्चित केले जाते. याबाबत नियमावलींच्या साहाय्याने योग्य व अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.