दुर्गंधी, अस्वच्छतेतून सुटका; ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित

नवी मुंबई नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील गावांत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ग्रामीण भागांतील मलनिस्सारण व्यवस्थेकडे पालिकेने गेली अनेक वर्षे दुर्लक्ष केल्याने गावांना उकिरडय़ांचे रूप आले होते. नवी मुंबई पालिका क्षेत्रात २९ गावे असून नेरुळ, बेलापूर, घणसोली, गोठवली या गावांत मलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. यावर पालिका जवळपास ३० कोटी रुपये खर्च करणार आहे. पालिकेने ग्रामीण झोपडपट्टी भागात मलवाहिन्या टाकण्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

गाव, गावठाण, झोपडपट्टी आणि शहरी भागांचे मिळून नवी मुंबई हे आधुनिक शहर तयार झाले आहे. गेली २० वर्षे केवळ शहरी भागांतील सुविधांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवी मुंबई पालिकेचे ग्रामीण भागातील सेवा सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे नवी मुंबईत गावे आहेत पण गावात नवी मुंबई नाही अशी स्थिती आहे. गावात मल तसेच जलवाहिन्या टाकताना अनेक अडचणी येतात. घराजवळ खोदलेल्या खड्डय़ांत सांडपाणी सोडले जात आहे.  काही ठिकाणी तर मलवाहिन्या जवळच्या गटाराला जोडण्यात आल्या आहेत. सर्व गावांचा अस्तव्यस्त विकास झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गावांसाठी समूह विकास योजना जाहीर केली आहे, पण त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे आपल्या मालकीची एक इंच जागा सार्वजनिक सुविधांसाठी देताना ग्रामस्थांमध्ये हाणामाऱ्याही झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी गोठवली गावातील रस्ता रुंदीकरणात एका ग्रामस्थाचे दुकान तोडले गेल्याने त्यांचा राग येऊन उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांचे पती रमाकांत म्हात्रे यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. ही स्थिती जवळपास सर्वच गावांमध्ये आहे. कोणताही कंत्राटदार या जल व मल वाहिन्या टाकण्याचे काम घेताना घाबरतो. गावातील या अस्वच्छतेचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे. मलवाहिन्या न टाकल्याने जमिनीत हे सांडपाणी झिरपत राहाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचा अहवाल आहे. त्यात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात केवळ ग्रामीण व झोपडपट्टी भागात मलवाहिन्या नसल्याने पालिकेचा क्रमांक मागे गेला आहे. या भागांत स्वच्छतेचे तीनतेरा वाजत असून मलवाहिन्या व सार्वजनिक शौचालयांसाठी सर्वेक्षणात निश्चित करण्यात आलेले गुण पालिकेला गमावावे लागले आहेत. त्यामुळे पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी ‘व्हिजन सिवरेज लाईन’ आखले असून ग्रामीण व झोपडपट्टी भागांत मल वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्याची सुरुवात घणसोली, नेरुळ, बेलापूर, आणि गोठवली या गावांपासून होत आहे. यासाठी ग्रामस्थांना या मलवाहिन्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाच्या आहेत हे पटवून दिले जात आहे.

दर आठवडय़ात या कामांचा आढावा घेतला जात आहे. नवी मुंबईत एकूण २९ गावे असून टप्प्याटप्प्याने सर्व गावांतील मलवाहिन्या शहरी भागांतील एकत्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडल्या जाणार आहेत. गेली अनेक वर्षे न झालेले काम मार्गी लागत असल्याने प्रकल्पग्रस्त समाधानी आहेत.

तळवली गावाजवळील नोसिल नाक्यावरील झोपडपट्टी भागाच्या कामाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण व झोपडपट्टी भागांत मलवाहिन्यांची सुविधा देण्यावर पालिका लक्ष केंद्रित करत आहे. शहरी भागाप्रमाणेच या भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याची गरज आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच गावात ही सेवा पुरवली जाणार असून ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ही सेवा उभारली जात असल्याने त्यांनी सहकार्य करावे.

-डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नमुंमपा