करोना रुग्णवाढीमुळे सांडपाणी सर्वेक्षण शिल्लक

नवी मुंबई : एप्रिल महिन्यापासून राज्यात वाढू लागलेल्या करोना साथरोगामुळे यंदाचे स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणदेखील लांबणीवर पडले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे एप्रिलच्या २० तारखेला येणारे केंद्रीय नागरी मंत्रालयाचे सर्वेक्षण पथकाने दोन तारखा देऊनही ते आलेले नाहीत. १ मे रोजी भेटीची तिसरी मुदत होती. केंद्रीय पथकाने नवी मुंबईतील कचरा व स्वच्छतेचे सर्वेक्षण केलेले आहे, मात्र सांडपाणी सर्वेक्षण शिल्लक राहिले आहे.

स्वच्छ भारत अभियानासाठी सुमारे सहा हजार गुणांकानाचे अनेक निकष पार करावे लागत असल्याने पालिकेने यंदाची जोरदार तयारी केली होती. या तयारीत संपूर्ण शहर रंगीबेरंगी करण्यात आले असून अनेक पातळ्यांवर शहर इतर शहरांच्या तुलनेत सरस ठरलेले आहे. गेल्या वर्षी नवी मुबंई देशात तिसरा क्रमांक जाहीर झाला होता. ‘यंदा निश्चय केला क्रमांक पहिला’ अशा घोषवाक्याने पालिकेला या सर्वेक्षणाला सामोरे गेली होती.

गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत पहिले सहा महिने अनेक र्निबधामुळे शांततेत गेले. सप्टेंबरनंतर देशातील टाळेबंदी उठविण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ची तयारी डिसेंबरपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी पालिकेने यंदा पहिला क्रमांक पटकविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यासाठी अनेक प्रकारे प्रबोधन करण्यात आले, तर जे.जे.च्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक मोठी भिंत विविध घोषवाक्यांनी रंगविण्यात आली. ‘निश्चय केला नंबर पहिला’ असे प्रोत्साहन देत पालिकेने पहिली तीन महिने कंबर कसलेली असताना फेब्रुवारीपासून करोनाचे संकट पुन्हा उभे राहिले. तोपर्यंत स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या दोन फेऱ्या झालेल्या होत्या. यात शहरातील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. मात्र शेवटची एक फेरी केवळ शहरातील सांडपाण्याचे नियोजन यावर आधारित होती. शौचालयात होणाऱ्या पाण्याचा वापरदेखील हे पथक पाहणी करणार होते. मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून राज्यात करोनाचे रुग्णवाढू लागल्याने केंद्रीय पथकाने तीन मुदत देऊनही या सर्वेक्षणासाठी येण्याचे टाळले आहे. आता हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या करोनामुळे यंदाचे स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणदेखील लांबणीवर पडलेले आहे.

ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीपासून स्वच्छ भारत अभियानासाठी पालिकेने तयारीला सुरुवात केली होती. डिसेंबरनंतर या तयारीला वेग देण्यात आला होता. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, यामध्ये पालिकेने पूर्ण लक्ष दिले होते. इतक्यात फेब्रुवारीपासून करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले. केंद्रीय पथकानेदेखील दोन वेळा अचानक भेट देऊन शहराची पाहणी केली आहे. आता शेवटची भेट असताना हे संकट उभे राहिले आहे. ते कमी झाल्यानंतर हे सर्वेक्षण होणार आहे.

– डॉ. बाबासाहेब रांजळे,

उपायुक्त, नवी मुंबई पालिका