उरण नगरपालिकेने यावर्षी शहरातील नालेसफाईची कामे करण्यासाठी जवळजवळ १९ लाख रुपयांची कामे काढली असून शहरातील नालेसफाई सुरू झाली आहे. या नाल्यातून काढण्यात येणारा गाळ व कचरा काढून तो नाल्याच्या काठावरच ठेवण्यात आला आहे. मागील पंधरा दिवसांपासून हे ढीग पडलेले असल्याने कंत्राटदार पावसाची वाट पाहत असल्याची उरणच्या नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. कारण पावसात पुन्हा एकदा हा गाळ व कचरा नाल्यातूनच वाहून गेल्यास कंत्राटदाराचा फायदा होईल.
नालेसफाईचा अनेक ठिकाणी फार्स केला जात असून केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठीच नालेसफाईची कामे काढून त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत. उरण शहरातील २७ पेक्षा अधिक छोटय़ा-मोठय़ा नाल्याची सफाई करण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. त्यासाठी निविदेत नालेसफाईची अंतिम तारीखही ठरविण्यात आलेली आहे. १५ दिवसांपासूनच या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र शहरातील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ व कचरा नाल्यावरच टाकण्यात आलेला आहे. मान्सूनपूर्व पाऊस व वाऱ्यामुळे पुन्हा एकदा हा कचरा नाल्यातच जाऊन नाले भरू लागल्याने कचरा काढून फायदा काय असा सवाल महेंद्र पाटील या उरणमधील नागरिकाने केला आहे. यामध्ये केगाव कुंभार वाडा दरम्यानच्या मोठय़ा नाल्यातून वाळू गाळ तसेच कचरा काढून त्याचे ढीग रचण्यात आलेले आहेत. तसेच शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील नाल्यातील कचरा काढून तोही काठावर ठेवण्यात आलेला आहे. या संदर्भात उरण नगरपालिकेचे अभियंता झेड.आर.माने यांच्याशी संपर्क साधला असता कचरा उचलण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असून त्यासाठी नगरपालिकेने स्वच्छता अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यांना यासंदर्भात सूचना देऊन कचऱ्याचे गाळाचे ढीग हटविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.