नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामाला गती दिली आहे. यासाठी २५ मे ही अखेरची मुदत आहे. अनेक ठिकाणी नालेसफाईच्या कामांना अद्याप वेग आलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने ही कामे संथगतीने सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शहरातील मुख्य नाल्यांसह पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वसाहतीअंतर्गत सफाईवर भर देण्यात आला आहे. मागील आठवडय़ापासून काम सुरू करण्यात आले आहे. नालेसफाईबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून सफाई कामगारांना सूचना करण्यात आल्या आहेत.
कामगारांना सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना हाताने गाळ काढण्याचे काम करावे लागत आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना राबवली जात नाही. पालिका क्षेत्रात एकूण ७४ हजार २८२ मीटर लांबीच्या नाल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. तो उपासण्याचे काम सुरू आहे.