X

फडणवीस सरकारने काय दिवे लावले?

शेतकऱ्यांचे ३५ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

शरद पवार यांचा हल्लाबोल; तेव्हा स्थर्यासाठी पाठिंबा, आता शक्यच नाही

विधानसभा निवडणुकीनंतर फक्त स्थिरतेसाठी भाजप सरकारला पाठिंबा देऊ केला होता; पण गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काय दिवे लावले हे सर्वाच्या समोर आहे. अशा सरकारला तशी वेळ आल्यास पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. रोजगारनिर्मिती, आर्थिक परिस्थिती या आघाडय़ांवर मोदी आणि फडणवीस सरकारची पीछेहाट झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पवार यांनी सध्या भाजप सरकारच्या विरोधात जनमानसात वातावरण तयार झाल्याकडे लक्ष वेधले. अशा वेळी नेते आणि कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन काम केल्यास त्याचा आगामी निवडणुकीत नक्कीच फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर टीका केली.

शेतकऱ्यांचे ३५ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सरकारने कर्जमाफीकरिता घातलेल्या अटी फारच जाचक आहेत. कर्जमाफीचा तयार करण्यात आलेला अर्ज भरण्यापेक्षा कर्जमाफी नको, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारी व खासगी बँकांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यावर १० ते १२ हजार कोटींपेक्षा जास्त कर्जमाफी होणार नाही हेच स्पष्ट होते, असे पवार यांनी सांगितले.

दिवाळीपर्यंत कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना न मिळाल्यास नोव्हेंबर महिन्यात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला. महागाईत झालेली वाढ आणि रोजगारनिर्मिती घटल्याबद्दलही पवार यांनी चिंता व्यक्त केली. हजारो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये कामावरून काढून टाकण्यात येत आहे. रोजगारनिर्मितीत वाढ न होणे किंवा रोजगारी गमवावी लागणे हे सारेच चिंताजनक असून, मोदी सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता पवार यांनी व्यक्त केली. बुलेट ट्रेनपेक्षा मुंबईतील उपनगरीय सेवा सुधारावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. मुंबई-अहमदाबाद हे अंतर बुलेट ट्रेन अडीच तासांत पार करणार आहे. यापैकी महाराष्ट्रातील प्रवास अवघा ३५ मिनिटांचा आहे. तरीही महाराष्ट्र आणि गुजरातने सारखाच खर्चाचा बोजा का उचलावा, असा सवालही शरद पवार यांनी यावेळी केला.

राणेंनाही टोला

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या नव्या पक्षाबद्दल पवारांचे लक्ष वेधण्यात आले असता राणे यांचा स्वत:चा मुलगा व समर्थक आमदार या पक्षात सामील होऊ शकले नाहीत त्या राणे यांच्या पक्षाबद्दल काय बोलणार, असा टोला पवार यांनी लगावला..

ठाणे पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह

पोलीस सेवेतून निलंबित झालेले व तुरुंगाची हवा खाऊन आलेले एक अधिकारी सेवेत परत दाखल झाल्यावर स्वत:ची प्रतिमा सुधारण्याकरिता मोठी कारवाई केल्याचा आव आणताना नाहक राष्ट्रवादीला बदनाम करीत आहेत, असा आरोप पवार यांनी प्रदीप शर्मा या वादग्रस्त अधिकाऱ्याचे नाव न घेता केला. मुंबई पोलीस चांगले काम करतात; पण मुंबईत येऊन ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल पवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. ठाण्यातील पोलिसांच्या वादग्रस्त भूमिकेकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.

First Published on: October 4, 2017 4:59 am
Outbrain