ऐरोलीतील आंबेडकर स्मारकाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर १५ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचे उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्यातील कामांचा शुभारंभ बुधवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाला. आंबेडकर अनुयायांच्या गर्दीने परिसर गजबजला होता.

उद्घाटन समारंभानिमित्त स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासून आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती. आंबेडकरी चळवळीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशेभूषेत लेझीमच्या तालावर मान्यवरांचे स्वागत केले.

स्मारकाच्या उद्घाटनानंतर शरद पवार यांनी ग्रंथालयाचे उद्घाटन करून पुस्तकांचीही पाहणी केली. त्याचबरोबर पहिल्या मजल्यावरील डोमची पाहणी करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमस्थळाच्या प्रवेशद्वारावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आणि छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तिथे पुस्तके पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.

स्मारकांच्या परिसरात प्रचंड गर्दी उसळल्यामुळे स्मारकासमोरच असलेल्या लेवा पाटीदार सभागृहात प्रेक्षकांसाठी पडदे लावून सभागृहातील कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उद्घाटन झाल्यानंतर देखील भीम गीतांचा कार्यक्रम सुरू राहिला आणि उपस्थित प्रेक्षकांनी देखील त्याला भरभरून दाद दिली. स्मारकावर आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे तिथे छायाचित्र टिपण्यासाठी मंगळवारपासूनच ऐरोलीतील रहिवाशांची गर्दी होत आहे.