राजकारणातील अभद्र प्रकारांची सुतराम कल्पना नसलेल्या महिलांना घरातून थेट सभागृहात पाठविल्यानंतर काय होते याचे एक ढळढळीत उदाहारण नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे समोर आले आहे. राजकारणाची कोणतीही कल्पना नसलेल्या मालदी केवळ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब कार्यकर्ती असल्याने एप्रिलमध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. तेव्हापासून त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राची मागणी करून त्यांना हैराण करून सोडले होते. त्यात त्यांचे पती आजारपणामुळे अनेक महिने अंथरुणाला खिळले असल्याने त्या खचल्या होत्या. अखेर नको ते नगरसेवकपद अशा निष्कर्षांपर्यंत आलेल्या मालदी यांनी आपली जीवनयात्रा संपविली. शुक्रवारी रेल्वे पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला.
राजकीय दबावामुळे मालदी यांनी केलेली आत्महत्या हे पहिले प्रकरण असल्याचे आढळून येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत, पण त्यांनी वर्तवलेला प्राथमिक अंदाज हा राजकीय दबाव आणि ताणतणाव आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी यांची कार्यकर्ती असलेल्या मालदी यांचा पालिकेतील प्रवेश केवळ योगायोगामुळे झाला होता. नेरुळ येथील प्रभाग ८८ हा महिला ओबीसी राखीव झाल्याने शेट्टी यांना ‘मुकी बिचारी कोणीही हाका’ अशा कार्यकर्तीचा शोध सुरू होता. तेव्हा त्यांच्यापुढे मालदी यांचे नाव आले आणि शेट्टी यांनी दिलेल्या आर्थिक व राजकीय पाठबळामुळे त्या नगरसेविका झाल्या. स्वयंपाकघरातून थेट पालिकेच्या सभागृहात जावे लागल्याने गांगरून गेलेल्या मालदी यांच्यावर काहीसा राजकीय दबाव जाणवत होता. त्यात विरोधकांनी त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची मागणी केली होती.
पालिका प्रशासनानेही त्यांच्याकडे जातप्रमाणपत्र मागितले होते. निवडणूक आयोगानेही निवडणुकीनंतर सहा महिन्यांत राखीव प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांनी आपले प्रमाणपत्र कोकण विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. जात प्रमाणपत्राच्या या तणावातच मालदी यांच्या प्रभागातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अध्यक्षपदावरूनदेखील काही दिवसांपूर्वी कुरबुरी झाल्या होत्या. अखेर मालदी यांना अध्यक्ष करण्यात आले पण त्यातून बरेच हेवेदावे निर्माण झाले होते. त्यामुळेच ऐन गणेशोत्सवात २३ सप्टेंबरला मालदी गायब झाल्या होत्या. त्यांच्या मूळ गावी लातूरलाही पोलिसांनी चौकशी केली पण त्या तेथेही न गेल्याचे आढळून आले. शुक्रवारी सकाळी रेल्वे पोलिसांना सापडलेल्या एका बेवारस महिला मृतदेहाची ओळख पटली आणि तो मृतदेह मालदी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. अतिशय शांत, मितभाषी असलेल्या मालदी यांच्या निधनाने परिसरात एकच शोककळा पसरली.