घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तक्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना संविधान सादर केल्याच्या घटनेला ६६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उरणमध्ये शेकापतर्फे गुरुवारी संविधान गौरव फेरी काढण्यात आली. बौद्धवाडय़ातील आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात फेरी काढण्यात आली, यात विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. यानंतर राघोबा मंदिर येथे जाहीर सभा घेण्यात आली.

आंबेडकर उद्यानातील पुतळ्यास शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून एका सजविलेल्या वाहनांतून आंबेडकरांच्या प्रतिमेसह संविधानाची मिरवणूक काढण्यात आली होती. जाहीर सभेत बोलताना माजी आमदार विवेक पाटील यांनी घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांनी दिलेले अधिकार व कर्तव्य, धर्मनिरपेक्षता, शिक्षण, रोजगार व भाषण, लेखनस्वातंत्र्य, समानतेचा अधिकार यांचा उहापोह केला. या सभेत शेकाप नेते मेघनाथ तांडेल व बौद्धसभेचे नितीन संकपाळ यांचीही भाषणे झाली. मुंबईवर सात वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.