शिल्पा पुरी यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सिडकोच्या अधिकाऱ्यांवर आणि व्यवस्थापकीय संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी खारघरवासीयांनी मंगळवारी सायंकाळी खारघर पोलीस ठाण्यात आंदोलन केले. शिल्पा यांच्या मृत्यूला क्रेनचालकाएवढेच सिडकोचे निष्क्रिय अधिकारी व कंत्राटदारही जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शिल्पाला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून गेला.

स्वच्छ खारघर मंचातर्फे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या मेणबत्ती मोर्चात खारघरवासीय मोठय़ा संख्येने सहभागी झाले. सुमारे दीडशे रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. गेल्या आठवडय़ात शनिवारी शिल्पा यांची दुचाकी उत्सव चौकातील एका खड्डय़ात अडकली आणि त्यांचा तोल गेला. मागून येणाऱ्या कंटेनरची धडक बसून शिल्पा यांचा मृत्यू झाला.

जिथे अपघात झाला, तेथील खड्डे बुजविले नव्हते, तरीही सिडकोच्या अधिकाऱ्यांनी बॅरिकेड्स का लावले नाहीत, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. पोलीस ठाण्याच्या इमारतीत शिल्पा यांचे छायाचित्र लावून मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी स्वत:ची जबाबदारी वेळीच पार पाडली असती, तर हा अपघात घडलाच नसता, असे मत त्यांनी मांडले. सिडकोचे अधिकारी नंदलाल दलाल यांच्या अखत्यारीत हे काम होते, त्यामुळे त्यांच्याकडून लेखी स्पष्टीकरण मगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.