06 July 2020

News Flash

राष्ट्रवादीच्या पतनासाठी शिवसेना, भाजपची काँग्रेसशी ‘युती’

शिवसेने बरोबर खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे सर्व नगरसेवक मैदानात उतरले आहेत.

नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी करण्याची शिवसेना एकही संधी सोडत नसून दिघा येथील प्रभाग क्रमांक सहाच्या यादव नगरमधील मूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यां असलेल्या अपक्ष उमेदवार मधुमती पाल यांच्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांची हजेरी लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता यादव यांचे नगरसवेक पद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत असून ती शिवसेनेने भलतीच प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान आणि संध्याकाळच्या मतमोजणीत या ठिकाणी यादवी माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन महिन्यापूर्वी नेरुळ प्रभाग क्रमांक ८८ मधील पोटनिवडणूक अशाच प्रकारे भाजपने प्रतिष्ठेची केली होती पण राष्ट्रवादीने तिथे बाजी मारली. पुढील वर्षी होणाऱ्या महापौर निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेना भाजप युती ह्य़ा छोटय़ा निवडणुका महत्त्वाच्या करीत आहे.
दिघा यादव नगरमधील राष्ट्रवादीचे बाहुबली कार्येकर्ता रामअशीष यादव यांचा हा प्रभाग मागील सार्वत्रिक निवडणुकांत महिला मागासवर्गीय राखीव झाल्याने यादवकुलातील महिला पहिल्यांदाच राजकारणात उतरल्या. (हा प्रभाग तसा छोटा उत्तर भारतच असल्यासारखा दिसून येतो) यादव यांनी आपली बहीण संगीता यादव हिला गतवर्षी निवडणुकीत उभे करून भरघोस मतांनी निवडून आणले. या वेळी त्यांनी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघडीस आल्याने त्यांचे नगरसेवकपद गत वर्षी रद्द करण्यात आले. त्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी रविवारी, १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून ती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इतकी प्रतिष्ठेची केली आहे की पोलिसांचा मनस्ताप वाढू लागला आहे. या पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घातले असून खासदार राजन विचारे यांनीही प्रभाग ढवळून काढला आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेता विजय चौगुले तर गेली १५ दिवस या प्रभागात ठाण मांडून बसले आहेत. इतर शिल्लक पदाधिकारी व नगरसेवकांना बूथनुसार मतदार वाटून देण्यात आले आहे. शिवसेना ह्य़ा प्रभागात निवडणूक लढविण्यास उत्सुक होती मात्र त्यांच्याकडे स्थानिक उमेदवार नसल्याने मूळ काँग्रेसच्या कार्येकर्त्यां असलेल्या अपक्ष पाल यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. शिवसेनेचा जोडीदार पक्ष भाजप मात्र या निवडणुकीपासून चार हात लांब असून बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे शुक्रवार पासून बाहेरगावी गेल्या आहेत. शिवसेने बरोबर खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे सर्व नगरसेवक मैदानात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवाराला शिवसेना भाजपने पाठिंबा दिल्याने पक्षातील स्थानिक नेत्यांना उकळ्या फुटल्या आहेत. या युतीचा फायदा भविष्यात पालिकेत होणाऱ्या स्थायी समिती तसेच इतर प्रभाग समितीच्या काळात होणार असून मुख्य लक्ष पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महापौर निवडणुकीवर आहे. काँग्रेसच्या दहा नगरसेवकांच्या टेकूवर राष्ट्रवादीची पालिकेतील सत्ता कायम असून काँग्रेस नगरसेवक नाराज असल्याचे यातून दिसून येत आहे. त्यामुळे यादव नगरमधील यादवीनंतर पालिकेतील विविध समित्यांच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. राज्यात कुठेही नसलेले शिवसेना काँग्रेस पक्षातील या मैत्रीपूर्ण संबधांना उत्तर प्रदेशातील अपना दलाचे खासदार व एकेकाळी नवी मुंबईत विविध निवडणुकांत उभे राहण्याचा दांडगा अनुभव असलेले हरिबन्स सिंह यांनीदेखील या प्रभागात हजेरी लावून आपल्या यादव मित्रांना पाल यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

लक्ष्य महापालिका !
नाईक यांच्या मदतीला स्थानिक यादव असून त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव नाईक यांनी निवडणुकीची व्यहूरचना हातात घेतली आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक इतके दिवस अधिवेशानात व्यग्र असल्याने शेवटच्या तीन दिवसांत प्रभागाची सूत्रे हाती घेतली आहेत. नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शेजारच्या मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि विद्या चव्हाण यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. एका प्रभागातील एक साधी निवडणूक इतकी प्रतिष्ठेची करण्यामागे राष्ट्रवादीचे शहरातील आसन डळमळीत करण्याचे आहे. याच भागातील राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक बेकायदा बांधकाम प्रकरणात अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पालिकेतील चार पाच नगरसेवक कमी झाल्यास काँग्रेसच्या सहकार्याने पालिकेतील सत्ता उलथवून टाकण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2016 3:25 am

Web Title: shiv sena bjp congress alliance against ncp in navi mumbai
Next Stories
1 कर्णकर्कश आवाज, जीवघेणा वेग..
2 पिक करपलं!
3 डॉ. आंबेडकरांच्या जयंती कार्यक्रमांना उपस्थितीची उणीव
Just Now!
X