|| विकास महाडिक

कॅबिनेट मंत्रिपद भोगलेल्या नाईक यांना संधी की दोनदा आमदार राहिलेल्या म्हात्रे यांची वर्णी? : – शिवसेना-भाजप युती सरकारच्या पहिल्याच कालखंडात तीन वर्षे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या काळात दहा वर्षे अशी १३ वर्षे गणेश नाईक यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबईला आता पुन्हा एकदा मंत्रिपदाची आस लागली आहे. यात मंत्रिपदाचा अनुभव असलेले गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात घेतले जाते, की भाजपच्या दोन वेळा आमदार राहिलेल्या नाईक यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी मंदा म्हात्रे यांना संधी दिली जाते का, हा प्रमुख मुद्दा ठरणार आहे.

दिवाळीनंतर महायुती राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधलेल्या म्हात्रे यांनी महिनाभरापूर्वी बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी पदरात पाडून घेतली आणि जिंकूनही दाखवली. त्यामुळे म्हात्रे यांचे पक्षातील स्थान मजबूत झाल्याची चर्चा सुरू झाली.

आमदार आणि सहा वर्षे विधान परिषदेचे प्रतिनिधित्व म्हात्रे यांनी केले आहे. भाजपच्या वाटय़ाला येणाऱ्या किमान राज्यमंत्रिपद तरी या वेळी मिळावे, यासाठी त्यांचे प्रयत्न राहणार आहेत. कोकण विभागीय क्षेत्रात भाजपच्या निवडून आलेल्या त्या एकमेव आमदार असल्याचा दावा केला जाणार आहे.

बेलापूरची उमेदवार मिळेल की नाही, या संभ्रभात असताना त्यांनी संघाचे ‘नागपूर कनेक्शन’ वापरून ही उमेदवारी पटकाविल्याचीही चर्चा आहे. या संपर्काचा उपयोग करून मंत्रिपद मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे ऐरोली मतदारसंघातून जवळपास ८० हजार मताधिक्य मिळविलेले माजी मंत्री गणेश नाईक सरकारमध्ये शिरकाव करण्यासाठी मोर्चेबांधणी करणार हे स्पष्ट आहे. त्यासाठी ते ‘गुजरात संपर्का’चा वापर करणार असल्याची शक्यता आहे.

नाईक यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. पक्ष वाढीसाठी ठाणे जिल्ह्य़ाचे नेतृत्व म्हणून भाजपने त्यांना स्वीकारले आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे शहराला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे.

त्यांना शह देण्यासाठी भाजप नाईक यांना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात या वेळी आयारामांना सामावून घ्यायचे की निष्ठावंतांना संधी द्यावी, याबाबत मोठा चर्चा होणार आहे.

आता पालिका लक्ष्य

सहा महिन्यांनी नवी मुंबई पालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. यापूर्वी नाईक यांच्या माध्यमातून शिवसेना, नागरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिलेली ही राज्यातील एक श्रीमंत पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता यावी, यासाठी नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नाईक यांनी ४९ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करून  भाजपकडे ही पालिका यापूर्वी आयती सुपूर्द केली आहे. त्यामुळे एका पालिकेच्या बदल्यात मंत्रिपद  मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडून खोडा?

नाईक यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत शिवसेना खोडा घालू शकते. पहिल्या मंत्रिमंडळ प्रवेशाच्या वेळी नाईक यांना पालिकेवर भगवा फडकविण्याचे आव्हान देण्यात आले होते. ते त्यांनी पेलल्यानंतर दीड महिन्याने त्यांचा मंत्री मंडळ प्रवेश झाला होता.