13 July 2020

News Flash

नवी मुंबईत ‘मविआ’ कठीण?

पालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येण्यात अनेक अडचणी

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाशी येथे जल्लोष केला.

पालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येण्यात अनेक अडचणी

विकास महाडिक, नवी मुंबई

शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा ‘प्रयोग’ राज्यात यशस्वी होत असताना या नवीन प्रयोगाला येत्या पाच महिन्यांत होऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अपशकून होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या ४९ नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवक स्वगृही वा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद पुन्हा वाढणार आहे. त्याचवेळी स्थानिक पातळीवरील राजकीय स्पर्धेमुळे एकत्रितपणे हे तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जाणे कठीण असल्याचे दिसत आहे.

राज्यातील नवीन सत्ता समिकरणांच्या पार्श्वभूमी वर पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडी होणार का याची चर्चा सुरूझाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाताना गणेश नाईक यांनी पक्षाचे ४९ नगरसेवकही नेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या १० नगरसेवकांपैकी पाच नगरसेवकही भाजपात गेले . त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस- राष्ट्रवादीचे पुरते खच्चीकरण झाले आहे. मात्र, राज्यात शिवसेनेसोबत या पक्षांनी सत्ता काबीज केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

केंद्र आणि राज्यात एकच सरकार अस्तित्वात येणार असल्याची खूणगाठ बांधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नाईकांना आता पालिकेची निवडणूक एक मोठे आव्हान ठरणार आहे. नवी मुंबईत नाईक विरुद्ध सर्व असे चित्र प्रत्येक निवडणुकीत दिसून आले आहे. भाजपाच्या मूळ सहा नगरसेवकांसह नाईक समर्थकांची ताकद बहुमतापर्यंत गेल्याने पालिकेवर अघोषित भाजपाची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंंबईत करण्याच्या हालचाली आत्तापासून सुरु झालेल्या आहेत.

१११ नगरसेवकांच्या नवी मुबंई पालिकेत शिवसेनेचे सध्या ३८ नगरसेवक असून विरोधी पक्षनेते पद या पक्षाकडे आहे. मात्र, नाईक यांच्या बरोबर गेलेल्या ४९ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवक हे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्याने ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.  त्यामुळे शिवसेनेला या खेपेस पालिकेवर भगवा फडकविण्याची खात्री वाटू लागली आहे. विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी वाटपाच्या अपमानाचा वचपा काढण्याची तयारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेण्याची तयारी स्थानिक शिवसेनेची आहे मात्र नवी मुंबईत युती, आघाडीच्या निवडणूका आतापर्यत लढल्या गेलेल्या नसल्याचा अनुभव आहे.

एकेकाळी पालिकेच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला पालिका निवडणूकीत समसमान प्रभाग वाटप लागणार आहे, तर काँग्रेसलाही  कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी जादा प्रभागांची अपेक्षा आहे. यावेळची निवडणूक ही पॅनल पद्धतीने होणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत या तीन पक्षांची जागा वाटपावरून खेचाखेची होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे राज्याची सत्ता स्थापन करण्यासाठी या तीन पक्षांची महाविकास आघाडी झाली असली तरी भाजपला निवडणूक पूर्वी टक्कर देण्यासाठी ही महाविकास आघाडी होणे शक्य नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आमदारांचे मनसुबे धुळीस

* राज्यात भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार याची खूणगाठ मनाशी बांधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांचे मंत्री पदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. नाईकांच्या घरी दोन ऐवजी एका आमदारकीची उमेदवारी देताना मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. नाईक यांनी मुलगा संदीप नाईक यांच्या प्रेमापोटी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी दोन्ही विधानसभा मतदार संघात उमेदवारी मिळेल याची अपेक्षा ठेवून असलेल्या नाईकांचा भाजपने पहिलाच अपेक्षाभंग केला. बेलापूरची उमेदवारी मंदा म्हात्रे यांना  देऊन भाजपने नाईक यांचा पत्ता कापला पण संदीप नाईक यांनी उमेदवारीची त्यागून वडिलांना ऐरोली मतदार संघातून निवडून आणले. परंतु आता  राज्यात भाजप सरकार न आल्याने नाईकांच्या या कॅबिनेट मंत्री पदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

ल्ल पाच वर्षांपूर्वीच भाजपला जाऊन मिळालेले  पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची पहिल्या सत्रात सिडको अध्यक्ष पदावर बोळवण केल्याने नाराज असलेल्या ठाकूर यांनी यंदा किमान राज्यमंत्री पद आणि त्या अनुषंगाने येणारे रायगड जिल्हा पालकमंत्री पद तरी पदरात पडावे अशी अपेक्षा बाळगली होती.ठाकूर यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली असती तर रायगडसाठी पालकमंत्री आयात करावा लागला नसता.

*  म्हात्रे यांनाही राज्यमंत्री पदाची आस होती.  किमान सिडको सारखे एखादे महामंडळ मिळण्याची इच्छा होती. अपक्ष म्हणून निवडून आलेले उरणचे आमदार महेश बालदी यांनी भाजपला पांठिबा दिला होता. त्यामुळे त्यांनाही महामंडळाचे स्वप्न होते.

पालिकेत सद्यस्थितीत भाजपची निर्विवाद सत्ता आहे.  या ताकदीला रोखणे ही काळाजी गरज आहे. राज्यात  शिवसेनेने भाजपचा वारु रोखला आहे.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे राज्यात केले ते काम नवी मुंबईत आम्ही करणार असल्याने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडी होणार आहे.

-विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, नवी मुंबई

नाईक यांचा भाजप प्रवेश हा पक्षाला नवीन उभारी देणारा आहे. त्यामुळे पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे. राज्यातील महाविकास आघाडी जास्त काळ टिकणार नाही. दोन आमदारांच्या फायदा पालिका निवडणूकीत होणार असून पक्षाला ७० ते ८० जागा मिळतील याची खात्री आहे.  महाआघाडी समोर आली तरी पालिकेवर सत्ता भाजपचीच असेल.

-रामचंद्र घरत, अध्यक्ष, भाजप, नवी मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2019 3:32 am

Web Title: shiv sena congress ncp face difficulty to alliance in navi mumbai municipal election zws 70
Next Stories
1 जत्रा हंगामामुळे उरण तालुक्यात उत्साहाला उधाण
2 मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक
3 वाहनविक्रीच्या गतीला मंदीचा ‘ब्रेक’
Just Now!
X