‘बेलापूर’ मिळविण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील

नवी मुंबई लोकसभा निवडणुकीची राज्यातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांच्या राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. भाजपाच्या ताब्यात असलेला बेलापूर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या पाच महिन्यांत नवी मुंबईतील अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अलीकडे पक्षातील वरिष्ठांच्या गाठीभेटी घेऊन माझा ‘बेलापूर’ कोणालाही देणार नाही अशी समज दिल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यातील मतदान सोमवारी पार पडले. आणखी दोन टप्यातील मतदान झाल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होऊन लोकसभेतील राजकीय बलाबल स्पष्ट होणार आहे. या मतमोजणीमुळे विधानसभा क्षेत्रात पडलेल्या मतदानाची टक्केवारी कळणार असून विधानसभा निवडणुकीसाठी मतदार संघावर दावे प्रती दावे सुरू होणार आहेत.

नवी मुंबईत दोन विधानसभा मतदारसंघ असून त्यावरुन लोकसभा निवडणुकीच्या निकाला अगोदरच रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यात लोकसभेसाठी शिवसेना-भाजप युती करताना विधानसभा निवडणुकीचा तिकीट वाटप फॉम्र्युला ठरला असल्याची चर्चा आहे. पाच महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपमध्ये फिफ्टी फिप्टी जागांवर होणार असल्याचे दिसून येते. या जागावाटपात भाजपच्या काही जागा शिवसेनेला सोडण्याची वेळ येणार आहे. त्यात बेलापूरच्या जागेचा बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी पालिका व लोकसभा निवडणुकींचे प्रभागनिहाय, मतदारांची माहिती गोळा केली जात आहे. यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला जास्त मते मिळाल्यास नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघावर शिवसेना हक्क बजावणार आहे. पाच वर्षांपूर्वी बेलापूर मतदारसंघात भाजपचे कोणतेही अस्तित्व नसताना गेल्या निवडणुकीत ऐन वेळी राष्ट्रवादीतून उडी मारून भाजपचे कमळ हाती घेतलेल्या मंदा म्हात्रे यांनी ही जागा निवडून आणण्यात यश मिळविले होते. या मतदारसंघात त्यांचे बलाढय़ प्रतिस्पर्धी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांचा त्यांनी निसटता पराभव केला आहे. त्यामुळे ही लढत राज्यात चर्चेची ठरली होती. मात्र म्हात्रे यांचा हा विजय हा त्या वेळच्या मोदी लाटेचा विजय असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेसाठी मागून घेणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे स्थानिक नेते पक्ष नेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यावर मोदीलाटच होती तर मग ऐरोली विधानसभा मतदारसंघ भाजपला कसा गमवावा लागला, असा प्रतिवाद म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडला आहे.

ऐरोली विधानसभा मतदारात शिवसेनेसाठी अनेक उमेदवार दावे ठाकून असल्याने हा मतदारसंघ त्यांच्याकडे कायम राहणार आहे. या मतदारसंघावर दावा करावा असा उमेदवार भाजपकडे नाही. मागील निवडणुकीतील उमेदवार वैभव नाईक यांनी नांगी टाकलेली आहे.

या दोन्ही मतदारसंघात लोकसभेचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांना किती मताधिक्य मिळते यावर या मतदारसंघावरील शिवसेनेचा दावा अधिक पक्का होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार हे दोन्ही मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी सक्रिय झाले आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे  यांनी ‘मेरी झाँसी नहीं दूंगी’च्या धर्तीवर माझा बेलापूर नाही देणार, अशा आविर्भावात प्रयत्नशील आहेत.