News Flash

शिवसेनेच्या प्रयत्नांना अपयश

चौगुले यांनीही चव्हाण यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली होती.

नवी मुंबई महानगरपालिका

स्थायी समिती सभापतीच्या निवडीनंतर नाईक-पाटील कुटुंबातील कटुता संपुष्टात

काँग्रेसचे एक मत मिळावे यासाठी थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची भेट भिवंडी येथे भेट घेऊन गळ घालणारे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आल्याचे मंगळवारी झालेल्या नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निकालावरून स्पष्ट झाले. एका शहराच्या सभापतीपद काय मागता आम्ही तर तुम्हाच्या पक्षाचा मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत होतो, अशा शब्दात चव्हाण यांनी शिंदे यांना टोला हाणला. काँग्रेसचे एक मत मिळावे यासाठी सेनेच्या स्थानिक व जिल्हा नेत्यांनी शनिवापर्यंत पराकोटीचे प्रयत्न केल्याचे समजते. याऊलट राष्ट्रवादीने काँग्रेसच्या एका मतासाठी थेट चव्हाण यांना साकडे घालून स्थानिक नेत्यांना चार हात लांब ठेवल्याचे दिसून येते.

नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदावर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या महापौर पदाची गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे शिवसेनेने या निवडणुकीला जास्त महत्त्व दिले गेले. गेल्या वर्षीप्रमाणे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात आल्यास महापौर निवडणूक लढविणे सोपे जाईल, असे आराखडे सेनेचे स्थानिक नेते मांडत होते. समसमान मते झाल्यानंतरही अधांतरी असणारे सभापतीपद पदरात पाडता यावे, यासाठी शिवसेनेचे सर्व जिल्हा नेते दोन्ही खासदार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी येथील प्रचार सभा संपल्यानंतर चव्हाण यांना एका हॉटेलमध्ये भेट घेतली. या वेळी नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी निर्णायक असलेले काँग्रेसच्या मीरा पाटील यांचे एक मत शिवसेनेच्या उमेदवाराला देण्यात यावे, अशी गळ घातली. मात्र काँग्रेस आघाडी धर्म पाळणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केल्यामुळे सभापतीपदासाठी स्थायी समिती सदस्यपद स्वीकारलेल्या विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. चौगुले यांनीही चव्हाण यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली होती. पण ती स्पष्ट शब्दात नाकारण्यात आली. याच वेळी पाटील यांचे गुरू माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनाही समज दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला हातून गेलेल सभापतीपद पुन्हा खेचून आणले आहे.

वैमनस्याचा अंत गोड

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक आणि दिवंगत माजी स्थायी समिती सभापती डी. आर. पाटील यांचे राजकीय वैमनस्य नवी मुंबईत जगजाहीर आहे. नाईक शिवसेनेत असताना तुर्भे येथील शिवसैनिक सोमनाथ म्हात्रे आणि बबन पाटील यांच्या खुनामुळे हे वैमनस्य टोकाला गेले होते. त्यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे नाईक यांनी पाटील यांना सभापतीपदासाठी व भावाच्या उपमहापौरपदासाठी मदत केली. मात्र त्यानंतरही ही कटुता कमी झाली नव्हती. पाटील यांच्या निधनानंतर या दोन कुटुंबातील वैमनस्य बऱ्याच अशी कमी झाले मात्र पाटील यांच्या जेष्ठ कन्येला निर्विवाद सभापतीपद देऊन नाईकांनी शिवसेनेकडून सभापतीपद खेचून आणताना या वैमनस्याचा अंत गोड केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 3:02 am

Web Title: shiv sena fail to win nmmc standing committee chairman post
Next Stories
1 वैशाखवणव्याच्या भाज्यांना झळा
2 गोष्टी गावांच्या : आदिवासी ते आधुनिक गाव
3 आजि मतदारांचा दिनु..
Just Now!
X