स्थानिक नेते, आमदारांच्या समर्थकांत नाराजी

नवी मुंबई नवी मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या भाजप जवळिकीमुळे नवी मुंबई भाजपमध्ये धूसफूस वाढली आहे. स्वजातीचा जमाव जमा करून नवी मुंबईतील तीन समाज नेत्यांनी शासकीय पदे पदरात पाडून घेतल्याने गेली अनेक वर्षे पक्षाचा झेंडा रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना कॅबिनेट तर चौगुले यांना राज्यमंत्री दर्जा जाहीर करण्यात आला आहे, पण माजी मंत्री गणेश नाईक यांना विधानसभा निवडणुकीत अस्मान दाखविणाऱ्या म्हात्रे यांना अद्याप एखादे महामंडळपण न देण्यात आल्याने त्यांच्या सर्मथकांत नाराजी आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही दिघा, ऐरोली परिसरातील झोपडपट्टीबहुल भागात आपले वर्चस्व कायम ठेवणारे विजय चौगुले यांचे शिवसेनेतील स्थान डळमळीत झाले आहे. महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा हे शिवसेनेत सक्रिय झाल्यापासून चौगुले हे अडगळीत गेल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वजातीय वडार समाजाची संघटना उभारून सोलापूर येथे भव्य मेळावा आयोजित केला. विधानसभा निवडणुकीतील वडार समाजाच्या मतांचे गणित लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मेळाव्याला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर, चौगुले यांना वडार समाजाच्या समन्वय समितीचे अध्यक्षपद देऊन त्याला राज्यमंत्री दर्जा देणार असल्याचे जाहीर केले. या घडामोडींनंतर चौगुले यांना ऐरोली मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट झाली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्यास ऐरोली मतदारसंघातून भाजपकडे प्रबळ उमेदवार नाही. माथाडी संघटनेचा पांठिबा, झोपडपट्टी मतदारसंघातील व्होट बँक आणि पक्षाचे मतदार यामुळे चौगुले यांना ऐरोली मतदारसंघात जास्त रस आहे.

एकीकडे, चौगुले यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली असली तरी, त्यांची भाजपशी जवळीक पक्षातील अन्य नेत्यांना खुपलेली नाही.   एका समाजाची ताकद दाखवून चौगुले यांनी थेट राज्यमंत्री दर्जा पदरात पाडून घेतल्याने भाजपचे पदाधिकारी नाराज झाले आहेत, पण मुख्यमंत्र्यांच्या अचानक घोषणेनंतर त्यांचे काहीच चालेनासे झाले आहे.

म्हात्रे यांच्या गोटात नाराजी

मंदा म्हात्रे यांना मंत्रिमंडळातील समावेशाची अपेक्षा होती, पण हा समावेश आता उपयोगाचा नसल्याची भावना वाढीस लागली आहे.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना सिडकोसारख्या श्रीमंत महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले तर कोळी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या रमेश पाटील यांना थेट आमदारकी देण्यात आल्याने म्हात्रे यांच्या गोटात नाराजी आहे.

घरतांच्या अपेक्षाही धुळीस?

याशिवाय पक्षाचे अध्यक्ष रामचंद्र घरत हे ऐरोली किंवा बेलापूर मतदारसंघातून या वेळी निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्यास इच्छुक आहेत. चौगुले यांच्या संभाव्य प्रवेशामुळे त्यांच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या आहेत. चौगुले यांच्या शिवसेना त्यागानंतर ऐरोलीतील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधण्याच्या विचारात आहेत.