कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा इशारा

शिवसेना हा सच्च्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कोणत्याही गटबाजीला थारा नाही. नवी मुंबईत कोणी गटबाजी करण्याचा छुपा प्रयत्न करत असेल तर त्याला पक्षात थारा दिला जाणार  नाही. स्थायी समिती सदस्याच्या राजीनाम्यावरून कोणी गटबाजी करत असेल, त्याचा योग्य वेळी मातोश्रीकडून समाचार घेतला जाईल, असा इशारा ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी, विजय नाहटा यांची उपनेतेपदी तर वरुण सरदेसाई यांची युवा सेनेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सीवूड्स येथे आयोजित सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

ठाणे जिल्हा परिषदेवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकवण्यात यश मिळवले आहे. आगामी काळात नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

आगामी काळात नवी मुंबई, ठाणे, मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असे शिंदे म्हणाले.

खासदार राजन विचारे यांनी सर्वानी एकजुटीने काम करून पक्षाची ताकद वाढविण्याचे आवाहन केले. नाहटा यांनी नवी मुंबईत एकजुटीने काम केले जाईल व शिवसेनेला तरुणांच्या साथीने अधिक बळ देण्यात येईल, असे आश्वासन दिले. कार्यकर्ता मेळाव्याला पालकमंत्र्यांसह खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, नवी मुंबईतील विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

विजय चौगुले अनुपस्थित

शिवसेनेचे नवी मुंबईतील सगळे पदाधिकारी, नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित असताना विजय चौगुले मात्र अनुपस्थित होते. त्यांची अनुपस्थिती हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. कोणाला स्थायी समिती सदस्य व विरोधीपक्षनेतेपद मिळणार, चौगुले पक्ष सोडणार का याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या.

शिवसंपर्क अभियान.. 

नवी मुंबईत शिवसेनेची ताकद मोठी असून शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी व अनेकांना शिवसेनेशी जोडण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आवाहन विठ्ठले मोरे यांनी केले. तर शिंदे, विचारे, नाहटा व मान्यवरांनी याला पाठिंबा देत लवकरच शिवसंपर्क  अभियान राबवण्याची ग्वाही दिली.