18 January 2018

News Flash

शिवकालीन सनदेतून ऐतिहासिक पैलू प्रकाशात

शिवकालीन अस्सल मोर्तब प्रथमच समोर 

सागर नरेकर, बदलापूर | Updated: January 2, 2018 1:43 AM

शिवाजी महाराजांनी संत रामदासांना दिलेली सनद; शिवकालीन अस्सल मोर्तब प्रथमच समोर 

छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना १६७८ मध्ये पाठवलेली एक सनद नुकतीच प्रकाशात आली आहे. या सनदेत महाराजांनी काही गावे इनाम म्हणून दिल्याचा उल्लेख आहे. या सनदेच्या हस्तलिखिताच्या इतरांनी तयार केलेल्या नक्कल प्रती यापूर्वीही उपलब्ध होत्या. मात्र लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात या अस्सल दस्तावेजाची छायांकित प्रत सापडली आहे. यामुळे शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्का पहिल्यांदाच समोर आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना पाठवलेली एक सनद नुकतीच समोर आली आहे. इतिहास संशोधक संकेत कुलकर्णी यांना या सनदेची ‘फोटोझिंकोग्राफ’ अर्थात त्याकाळची झेरॉक्स प्रत लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात सापडली आहे. १५ सप्टेंबर १६७८ रोजी लिहिलेल्या या सनदेत शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना काही गावे इनाम म्हणून दिल्याचे नमूद आहे. महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे दिले आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. या सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण ११ मोर्तबा असून एक मोर्तब पत्राच्या मुख्य बाजूवर असून उरलेल्या १० मोर्तबा पत्राच्या मागील बाजूस आहेत. या पत्रातील हस्ताक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते असल्याचेही बोलले जाते. ही सनद बदलापूरचे इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे यांनी उजेडात आणली आहे. २३ डिसेंबर २०१७ रोजी पुण्याच्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या पाक्षिक सभेत कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी पहिल्यांदाच या सनदेचे वाचन आणि नव्याने सापडलेल्या मूळ पत्राचे चित्र प्रकाशित केले.

यापूर्वी १९०६ मध्ये पहिल्यांदा या आशयाचे पत्र प्रकाशित झाले होते. ते देवनागरी भाषेत नक्कल केलेले होते. त्या काळात ब्रिटिशांच्या दस्तावेजावरून घेतलेल्या अनेक कागदपत्रांच्या नकला या हस्तलिखित होत्या. या पद्धतीत महाराजांचा शिक्का हा फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे रेखाटला जात होता. त्याबाबत ठोस पुरावे नसल्याने फक्त मोर्तब वा शिक्का असा असेल असे तर्क लावले जात होते. मात्र तब्बल १११ वर्षांनंतर या सनदेच्या माध्यमातून समोर आलेले हे मोर्तब पूर्णत: वेगळे असून त्यावर ‘मर्यादेयं विराजते’ असा स्पष्ट उल्लेख आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील अशा प्रकारचा ठळक पुरावा पहिल्यांदाच समोर आल्याची माहिती कौस्तुभ कस्तुरे यांनी दिली. यापूर्वी कोणत्याही संशोधकाने अस्सल मोर्तब पाहिला नव्हता, असा दावाही कस्तुरे यांनी केला आहे. तसेच फोटोझिंकोग्राफ ही दस्तऐवज सुरक्षित करण्याची प्रक्रियाही महत्त्वाची असून त्याद्वारे सुरक्षित केला गेलेला हा दस्तऐवजही त्यामुळेच अस्सल असल्याचे सिद्ध होते, असेही कस्तुरे यांनी सांगितले.

सनदेतील मोडी लिपितील उल्लेख

‘श्रीसद्गुरुवर्य श्रीसकळतीर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेऊनु विज्ञापना जे’ अशा मायन्याने हे पत्र सुरू झाले आहे. पुढे शिवाजी महाराजांनी स्वत:च्या शब्दांत पूर्वी समर्थानी त्यांना काय उपदेश केला त्याबद्दल थोडक्यात लिहिले आहे. त्यामुळे रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांना किती वंदनीय होते हे स्पष्ट होते.

First Published on January 2, 2018 1:43 am

Web Title: shivaji maharaj sends letters to samarth ramdas
  1. U
    ulhas
    Jan 2, 2018 at 1:35 pm
    च्यामायला हे लफडं झालं! आता रामदास स्वामींचा उल्लेख खोटा कसा सिद्ध करावा बरे?
    Reply