स्व. शिवाजीराव पाटील उद्यान, सेक्टर ४ अ कोपरखरणे

नवी मुंबईत ‘मॉर्निग वॉक’ संस्कृती रुजली आहे; पण ज्या स्थळी ही संस्कृती अधिक फोफावत असताना पालिकेच्या अनेक उद्यानांत साध्या सुविधांचीही बोंबाबोंब  आहे.

आरोग्यासाठी सकाळी घर सोडणाऱ्यांची संख्या नवी मुंबईत मोठी आहे. म्हणजे घरात बसून वजन वाढवून घ्यायचे आणि त्याबरोबर रोगांनाही आमंत्रण द्यायचे. असा हा दुहेरी तोटा अनेकांना नको असतो. मग पायात स्पोर्टस् शूज बांधायचे. ट्रॅक सूट घालायचा आणि बाहेर चालू पडायचे. अशी अनेकांची शिस्त वर्षांनुवर्षे आहे. ‘कोपरखैरणे सेक्टर ३ अ’मधील अनेकांची ही रोजची शिस्त आहे. यात कधीही खंड पडलेला नाही. शिवाजीराव पाटील उद्यानात कोपरखैरणेवासीय रोज जमा होतात. व्यायाम, चालणे, धावणे आणि योगासनांच्या माध्यमातून शरीराला वळण लावण्याचा प्रयत्न केला जातो. सुदृढ शरीरासाठीची उपासना यातून केली जाते. पहाटे पाच वाजता उद्यानात धावती आणि चालत्या पावलांची चाहूल लागते. मग त्यानंतर दोन ते तीन तास शरीरसंपदा कमावली जाते.

उद्यानात औषधी गुण असलेल्या रोपांची लागवड नेहमी केली जाते. काही ठिकाणी हिरवळ तयार करण्यासाठी नागरिक प्रयत्न करीत असतात. यात पालिकेने येथील रोपांची काळजी घेण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. उद्यानात शौचालय, स्वच्छता करण्यासाठी कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचा प्रस्ताव तयार करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. पालिकेने तो मंजूरही केला आहे; परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. पालिकेचेच उद्यान असतानाही अधिकारी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. उद्यानात सकाळी रा. स्व. संघाची शाखा भरते. येथे एक तासाची शाखा घेण्यात येते. योगासने, शारीरिक कवायती, प्राणायम केला जातो. उद्यानात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी छत नाही. पण याची तमा न बाळगता लोक येथे आणि एकत्र येऊन गप्पा रंगवतात. काहींनी आपल्या गटांमध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या गटाला ‘गार्डन ग्रुप’ असे नाव देण्यात आले आहे. सध्या उद्यानात बीट मार्शलमार्फत केली जाणारी पाहणी होत नसल्याने रात्री मद्यपींची आणि प्रेमीयुगुलांची संख्या वाढलेली आहे.

पालिकेने सुसज्ज असे उद्यानबनवले आहे; परंतु येथे साफसफाई नसल्याने नागरिकांना त्रास होतो. पावसाळ्यात येथील अवस्था दयनीय होते. उद्यानात काही मद्यपी येत असतात.

चंदन घटवाट, नागरिक

सकाळी फिरण्यासाठी किंवा व्यायामाच्या निमित्ताने येणाऱ्यांशी मैत्रीचे सूर जुळले आहेत. उद्यानात गैरसोयी असतील, पण काही सोयी पुरविल्यास आनंदच होईल.

हिंदुराव अनपट, नागरिक