|| विकास महाडिक, 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप प्रवास लाभदायक ठरेल का? 

शिवसेना असो वा राष्ट्रवादी नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक ज्या पक्षात असतील त्या पक्षाला नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश करून आमदारकी पटकवली. आता थोडय़ाच दिवसांमध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला नाईक सत्ता मिळवून देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राज्यात होणाऱ्या राजकीय स्थित्यांतराचे पडसाद आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता अधिक आहे. गणेश नाईकांच्या राजकीय प्रवासाप्रमाणेच महानगरपालिकेतील सत्तेचा लंबक फिरत राहिला. पालिका स्थापनेनंतर पहिली चार वर्षे शिवसेना, एक वर्षे नागरी विकास आघाडी आणि त्यानंतरची वीस वर्षे राष्ट्रवादीची एकहाती सत्ता पालिकेवर होती. अर्थात, गणेश नाईकांच्या राजकीय प्रवासाप्रमाणेच सत्तेचे गणित बदलत होते. पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या पालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या एकेकाळच्या मित्रांमध्येच लढत अपेक्षित आहे .

राज्यातील एक वजनदार नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची कास धरल्याने नवी मुंबईतील भाजप मजबूत झाला. बेलापूरमधून मंदा म्हात्रे, तर ऐरोलीतून स्वत: गणेश नाईक हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. या अगोदर २० वर्षांत भाजपला साधा भोपळाही फोडता आला नव्हता.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे केवळ सहा नगरसेवक निवडून आले होते. यात आता नाईक यांच्याबरोबर भाजपात गेलेल्या ४९ नगरसेवकांची भर पडली आहे. जुने आणि नवीन अशा ५५ नगरसेवकांची फौज आता भाजपकडे आहे.

लोकसभा निवडणुकीत सेनेला ८४ हजारांचे मताधिक्य

नवी मुंबईत गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे विळ्या भोपळ्याचे वैर सर्वज्ञात आहे. सत्ताधारी पक्षाबरोबर जाऊन शहराचे महत्त्वाचे प्रश्न सोडवता यावेत आणि आपलेही ‘चांगभले’ व्हावे यासाठी भाजपचे कमळ हाती घेतलेल्या नाईक कुटुंबीयांना ही पालिका निवडणूक सोपी नाही. राज्यात नवी सत्तासमीकरणे उदयाला येण्याची चिन्हे असल्याने नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले नगरसेवक  घरवापसी करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास पालिकेत सत्ता आणण्यासाठी शिवसेना आक्रमक होऊ शकते. भाजपचे दोन भाजपचे आमदार असले तरी सेनेच्या खासदाराने ८४ हजारांचे मतधिक्य मिळविलेले आहे. त्यामुळे नाईकांची कसोटी लागणार आहे.

सेना-भाजप मुख्य प्रतिस्पर्धी

नाईक यांच्या पक्षांतरामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत झाला. सारेच जुने शिलेदार सोडून गेले. काँग्रेस आधीपासूनच कमकुवत होता. आता युतीत मतभेद निर्माण झाल्याने सेना-भाजप समोरासमोर येण्याची शक्यता आहे.