|| विकास महाडिक

जगवणाऱ्यांना साथी द्यायची की भविष्यात सांभाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाठिंबा द्यायचा? :- साठ-सत्तरच्या दशकात पश्चिम महाराष्ट्रातून पोटापाण्यासाठी मुंबईत आलेला माथाडी कामगार अस्तित्वाच्या लढाईसाठी सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या आश्रयाला गेला आहे. चार प्रमुख संघटनांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक आणि शरद पवार यांच्या शब्दाबाहेर नसलेला हा कष्टकरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे कायदा करून कामगाराला जगवला त्यांच्या मागे जायचे की पुढे सांभाळणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा, अशा स्थितीत माथाडी कामगार आहे.

साठच्या दशकात पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य स्थितीमुळे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागातून शरीरयष्टीने मजबूत असलेले तरुण मुंबईत गोदीमध्ये कामाला आले. एकमेकांना साहाय्य करीत अनेक तरुणांनी गावातील मित्रांना मुंबईत ओझी वाहण्याच्या या कामासाठी आणले. कामाच्या ठिकाणी राहायचे आणि दिवसभर काम करायचे असा दिनक्रम असलेल्या या तरुणांना स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी सत्तरच्या दशकात संघटित करून संघर्ष करण्यास भाग पाडले. आज राज्याच्या कानाकोपऱ्यात हा माथाडी कामगार विखुरलेला असून ही संख्या तीन लाखाच्या घरात आहे. पाटील यांनीच स्थापन केलेल्या माथाडी संघटनेमधील सदस्य संख्या लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळेचे ही संघटना राजकीयदृष्टय़ा प्रभावी ठरली आहे.

आजच्या घडीला या संघटनेचे एक पदाधिकारी माजी आमदार नरेंद्र पाटील महायुतीच्या जवळ आहेत, तर दुसरे आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माथाडी कामगारांच्या भवितव्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीला मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. कोरेगावमधील राष्ट्रवादीचे उमेदवार शिंदे वगळता इतर सर्व मतदारसंघात जर माथाडी कामगार असतील तर त्यांनी तेथील महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा हा फतवा आहे. माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. यात घरांचा मोठा प्रश्न निकाली निघालेला नाही. सिडको व म्हाडाच्या माध्यमातून तो सोडविला जाणार आहे.

माथाडी कायदा बासनात गुंडाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांची तिसरी पिढी आता काम करीत आहे. त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू असून गिरणी कामगारासारखा हा कामगार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सत्तेतील सरकारची गरज आहे. इतकी वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राहिलेले हे कामगार सत्तेचे फिरलेले वारे पाहून शिवसेना-भाजपबरोबर जाऊ लागले आहेत. त्यामुळे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर आणि शिंदे यांनी विरोधकांबरोबर राहण्याची जणू काही व्यूहरचना आखण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांप्रती निष्ठा

केंद्र आणि आता राज्यातील सत्तेचा सारीपाट स्पष्ट होऊ लागला आहे. त्यामुळे पाटील यांनी माथाडी कामगारांना महायुतीला मतदान करण्याचा आदेश दिला आहे. पाटील हे कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग संघटनेत आहे. कामगारांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांची भांडी देखील घासेन असे जाहीर करून त्यांनी कामगार आणि मुख्यमंत्री या दोघांच्या मनात जागा निर्माण केली आहे. संघटनेत चार महत्त्वाची पदे आहेत. शिंदे यांनी असा कोणताही आदेश दिलेला नाही, मात्र जास्तीत जास्त माथाडी कामगार मतदार असलेल्या कोरेगावात माथाडी जाऊन मतदान करतील हे स्पष्ट आहे. महायुती आणि महाआघाडीत माथाडी कामगार भरडला जाणार आहे, मात्र कामगारांचे भवितव्य या प्रश्नावर ७० ते ८० टक्के कामगार हा महायुतीच्या बाजून वळणार असून २० ते ३० टक्के हा महाआघाडीला पसंती देणार असल्याचे दिसून येते.