18 October 2019

News Flash

मी शिवसेनेतच

शिवसेना उपनेते विजय नाहटा यांना या वेळी युतीचे उमेदवार म्हणून बेलापूर मतदारसंघातून तिकीट मिळण्याची आशा होती.

शिवसेना

विजय नाहटा यांचे समाजमाध्यमांवर पत्र

शिवसेना उपनेते विजय नाहटा यांना या वेळी युतीचे उमेदवार म्हणून बेलापूर मतदारसंघातून तिकीट मिळण्याची आशा होती. परंतु हा मतदारसंघ शिवसेनेऐवजी भाजपला मिळाल्याने येथून मंदा म्हात्रे या निवडणूक लढणार आहेत. शेवटच्या क्षणी बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाहटा शिवसेनेतच राहणार की पक्षाला सोडचिठ्ठी देणार याविषयी अनेक तर्कवितर्काना उधाण आले होते. ते अखेर नाहटा यांच्या समाजमाध्यमांवरील पत्रानंतर संपुष्टात आले आहेत.

नाहटा यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसैनिक आग्रही होते. अशा वेळी प्रत्येक शिवसैनिकांशी व्यक्तिगत चर्चा करणे शक्य नसल्याने समाजमाध्यमावरील पत्राद्वारे नाहटा यांनी संवाद साधला. पक्षप्रमुखांनी अखेरच्या क्षणी जो निर्णय घेतला, तो योग्यच होता. माझ्यासाठी मातोश्रीचा आदेश अंतिम होता. त्यामुळे मी शिवसेनेत आहे, मी शिवसेनेमुळेच आहे, ही माझी पक्की धारणा व श्रद्धा आहे, अशी भावना नाहटा यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

या त्यांच्या प्रतिक्रियेनंतर समाजमाध्यमांवर त्यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या ‘पोस्ट’ आल्या. नाहटा समर्थकांमध्ये काही दिवसांपासून निर्माण झालेला संताप या पत्रानंतर शमला. नाहटा शिवसेना सोडून कुठेही जाणार नाहीत, हे समजल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थकांनी आनंद व्यक्त केला. निवडणूक तिकिटावरून गेले कित्येक दिवस सुरू असलेली खदखद अखेर शमली.

First Published on October 9, 2019 1:52 am

Web Title: shivsena vijay nahata bjp akp 94