निवड झाल्याबद्दल नेमबाज आयोनिका पॉलचा सत्कार
पहाटे उठून एमईचा चार तास कसून अभ्यास. त्यानंतर न्याहरी, काही मिनिटांचा आराम आणि मग त्यानंतर नेमबाजीचा सराव. जिद्द, चिकाटी आणि सातत्य या त्रिसूत्रीमुळे ती दहा मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत ती देशाच्या महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. आज तिच्या यशाचे कौतुक वाटतेच, पण याहूनही मी कर्तृत्ववान मुलीची आई आहे, याचा मला अभिमान आहे. ब्राझील येथे होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत नेतृत्व करणाऱ्या आयोनिका पॉल हिची आई अपर्णा पॉल यांनी भावना व्यक्त केल्या.
आयोनिका हे यश प्राप्त करण्यासाठी विविध ठिकाणचा प्रवास आणि किमान सात तास केला. याच वेळी नेमबाजीमधील सवरेत्कृष्ट खेळाडूंकडून यशस्वी कामगिरीसाठी मिळणारे कानमंत्रही ती साठवून ठेवत होती. सोमवारी नवीन पनवेल वसाहतीमधील पिल्लई महाविद्यालयात आयोनिकाचा सत्कार सोहळा पार पडला. आयोनिका एमईच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. तिच्यासाठी खास गीते विद्यार्थ्यांनी रचली होती. काहींनी नृत्यांमधून तिची विजयश्री साकारली. आयोनिकाने रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. आयोनिकानी महाविद्यालयामधील शिक्षकांनी व व्यवस्थापकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.