पालिका प्रशासनाचा शुक्रवारपासून कारवाईचा बडगा; रेल्वेस्थानक परिसरातील खाऊगल्ल्याही बंद

 

नवी मुंबई : अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने आजपासून बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहर फेरीवालामुक्त करण्याचे ठरविले असून यासाठी कडक कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच खाऊगल्ल्यांवर बंदी जाहीर केली आहे. शुक्रवारपासून स्पा तसेच मसाज सेंटर, केस कर्तनालय व ब्युटी पार्लर हे २५ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. १५ मार्चपासून पालिका आयुक्तांनी विशेष आदेशाद्वारे खबरदारीची उपाययोजना गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यानंतर अंगणवाडी, बालवाडी, सर्व सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, ग्रंथालये, अभ्यासिका, सिनेमागृहे, नाटय़गृहे, हॉटेल व सार्वजनिक ठिकाणी असलेले जलतरण तलाव आणि व्यायामशाळा, मॉल्स, उद्याने व विरंगुळा केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत.

चोख आरोग्य सेवा व नागरिकांची गर्दी कमी करणे या दोन्ही पातळीवर प्रशासनाचे काम सुरू आहे. शहरातील रेल्वेस्थानकासमोरील गर्दीची दुकाने, किऑस यांच्याअंतर्गत असलेली खाऊची दुकाने आता ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात येणार आहेत.

पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या काळात शहर फेरीवालामुक्त करण्याचे ठरविले असून बेलापूर सेक्टर ११, फूड किऑस, खाऊ गल्ली, नेरुळ स्थानक परिसर, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली स्थानक परिसरातील दुकाने, पदपथावरील सर्व फेरीवाले सक्तीने बंद करण्यात येणार आहेत.

पालिकेपुढे ‘एसी’चा पेच

करोनाचे विषाणू वातानुकूलित खोलीमध्ये जास्त काळ जिवंत राहतात. त्यामुळे या यंत्राचा वापर कमी व गरजेपुरता करावा, असे लेखी आदेश पालिकेला प्राप्त झाले आहेत. मात्र नवी मुंबई महापालिका मुख्यालयात कायमस्वरूपी वातानुकूलित यंत्रणा सुरू असते. ही यंत्रणा बंद केली तर अडचण निर्माण होते. त्यामुळे पालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे.

लोकप्रतिनिधी समाजभान विसरले?

महापालिकेत शुक्रवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची कार्यक्रमपत्रिकाही देण्यात आली आहे. याबाबत स्थायी समिती सभापती नवीन गवते यांना विचारणा केली असता स्थायी समितीच्या सभेचे नियोजन केले आहे, मात्र उद्या याबाबतचा निर्णय स्थायी समिती सभागृहात होईल, असे सांगितले.

करोना विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठीचे निर्बंध हे नागरिकांचे आरोग्य हित नजरेसमोर ठेवून घालण्यात येत आहेत. सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे आणि कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये. शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याबाबत पालिका आरोग्यसेवा सज्ज ठेवण्यात आली आहे.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त