नियमांची पायमल्ली होत असल्याने महिला कामगारांमध्ये नाराजी

नवी मुंबई : टाळेबंदीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गाळे ठरावीक वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र, वेळेचा नियम डावलून मसाला बाजारात काही व्यापारी रात्री ८ ते ८.३० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येथील महिला कामगारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘एपीएमसी’तील वाढती गर्दी लक्षात घेऊन मर्यादित ग्राहक आणि वेळेचे बंधन घालून देण्यात आले होते. यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाजार परिसर खुला ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, मसाला बाजारातील ‘एफ’ गल्लीतील काही दुकानदार वेळेचे बंधन पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

मसाला बाजारातील ‘एफ’ गल्लीत बहुतेक दुकाने ही सुक्या मेव्याची आहेत. येथे बदाम, काजू, अक्रोड आणि खजूर छोटय़ा पिशव्यात भरले जातात. यासाठी मोठय़ा संख्येने महिला कामगार येथील गाळ्यांमध्ये असतात. काही व्यापारी उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवत असल्याने या महिला कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

करोनामुळे एपीएमसी बाजार आवारात सध्या कांदा-बटाटा चार वाजेपर्यंत, तर इतर मार्केट सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची वेळ निर्धारित कण्यात आली आहे. मात्र तरीही काही व्यापारी दुकाने सुरू ठेवत आहेत.

-अनिल चव्हाण, सचिव एपीएमसी