महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक

सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या आणि तक्रारी थेट पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडता याव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस-नागरिक समन्वय बैठकीकडे मात्र सामान्यांनी पाठ फिरवली. शहरात गुन्हे घडले की पोलिसांना दोष देणाऱ्या आणि तपासातील त्रुटींवर वारंवार टीका करणाऱ्यांनी दाद मागण्याची संधी गमावली.

गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे नवी मुंबईतील वातावरण संवेदनशील झाले आहे. त्या पाश्र्वभूमीवर शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी तसेच पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाला मात्र सुजाण नागरकांची उपस्थिती कमी होती. महाविद्यालयीन तरुण मात्र मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबई परिमंडळ एकसह शहरात मराठा क्रांती आंदोलनादरम्यान दंगली घडल्या. दोन गटांत तेढ निर्माण झाली. यामुळे शहारत अतिशय संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते. मालमत्तांचे नुकसान झाले होते. अंतर्गत वाद निर्माण होऊन एकाचा बळी गेला. आजही शहरीत ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये संवाद निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची जणीव करून देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु बैठकीला उपस्थित असलेल्या नागरिकांचे प्रमाण एकूण उपस्थितीच्या तुलनेत सुमारे ४० टक्केच होते. उर्वरित उपस्थिती महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पोलिसांचीच होती. गर्दी वाढवण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांना निमंत्रण देण्यात आले असे विद्यार्थ्यांनी सांगितले. कामाचा दिवस असल्याने नागरिकांची उपस्थिती कमी होती. पुढील काळात नागरिकांच्या सुटीच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मागणी करू, असे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

या दंगली दरम्यान शहराचे मोठे नुकसान झाले. केवळ सुसंवादाअभावी संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती अपेक्षित होती. यापुढेही असे कार्यक्रम आयोजित केले जातील.

– डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १