अपुरी जागा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरक्षित भूखंड पडून

नवी मुंबई टपाल कार्यालयासाठी सिडकोकडून भूखंड आरक्षित असताना ऐरोलीतील टपाल कार्यालय भाडय़ाच्या जागेत अनेक वर्षे सुरू आहे. जागा अपुरी पडत असल्याने कागदपत्रांच्या गराडय़ात काम करावे लागत आहे. आरक्षित भूखंडावर टपाल कार्यालय सुरू करावे, अशी मागणी कर्मचारी, नागरिक करीत आहेत.

ऐरोली सेक्टर १७ येथे १९९२ साली सिडकोच्या जागेवर भाडेतत्त्वावर हे टपाल कार्यालय सुरू झाले. सुरुवातीला ५ कर्मचारी कार्यरत होते, आता २२ कर्मचारी त्याच जागेत काम करीत आहेत. ऐरोली, दिघा, विटावा, कळवा, रबाळे येथील नागरिक, व्यावसायिक, बँका विविध कामांसाठी याच कार्यालयात येत असतात. दररोज दीड हजार टपाल, कागदपत्रे यांची आवक-जावक होत असते. मोठय़ा संख्येने दाखल झालेली कागदपत्रे, टपाल गोणीत ठेवून त्याचे कार्यालयात ढीग लागले आहेत. नागरिकांचीही गैरसोय होत आहे. सध्याची जागा ४०० चौरसफूट  असून ती कमी पडत आहे. टपाल पत्रांची छाननी, हाताळणी कार्यालयाबाहेर  करावी लागत आहे. त्यातच बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.  टेबलही मोजकेच असल्याने एकाचे काम संपल्यावर दुसऱ्या कर्मचाऱ्याला तेथे बसून काम करावे लागते.

कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार वाढले

कागदपत्रे, टपाल यांना सुरक्षित ठेवण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने गोणीत कागदपत्रे ठेवून ढीग लावले जातात. त्यामुळे एखाद्याचे टपाल पोहचले नाही तर ते यात मिळत नाहीत. यामध्ये काहीजणांची महत्त्वाची कागदपत्रेदेखील असतात. असे प्रकार वाढत आहेत, असे येथील नागरिक प्रभाकर बुटाला यांनी सांगितले.

जीर्ण इमारतीत जीव मुठीत धरून कर्मचारी काम करीत असतात. २०११-१२ मध्ये सेक्टर १८ येथील भूखंड क्रमांक १ वर टपाल कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली असून कार्यालयासाठी भूखंड आरक्षित ठेवला आहे, परंतु उच्चस्तरीय पाठपुरावा होत नाही. आम्ही आमच्या स्तरावर दिल्लीला पाठपुरावा करीत आहोत.

-विजय घाडगे,टपाल कार्यालय अधिकारी

गेली चार वर्षे मी स्थानिक स्तरावर ते दिल्लीपर्यंतच्या टपाल अधिकाऱ्यांना पाठपुरावा केला आहे. त्याकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. एक एकर आरक्षित भूखंड असूनही ती जागा टपाल कार्यालयाला देण्यास दिरंगाई, चालढकल होत आहे.

-उमाकांत एस. पाठक,ज्येष्ठ नागरिक