सिडकोबाधित बेलापूर पट्टी (ठाणे), पनवेल व उरणमधील ९५ गावांतील विद्यार्थ्यांना सिडकोकडून शिक्षणासाठी मदत म्हणून विद्यावेतन (स्टायपेंड) दिले जाते. चालू शैक्षणिक वर्षांत विद्यावेतनासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर ठेवण्यात आली होती. मात्र, ही मुदत वाढवावी तसेच उशिरा आलेले अर्ज स्वीकारण्यात यावेत, अशी मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवक संघटनेने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. तसेच, सिडकोने प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या शैक्षणिक खर्चाच्या प्रमाणात विद्यावेतन देण्याचीही मागणी केली आहे.

सिडकोने नव्या मुंबईकरिता जमिनी संपादित केल्याने येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करावे, अशी मागणी ४५ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार इयत्ता ११ वीपासून पदवीपर्यंतच्या तसेच तंत्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन सुरू करण्यात आले आहे. सध्या सिडकोकडून उच्च शिक्षणासाठीही विद्यावेतन दिले जात आहे. याचा फायदा येथील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना होऊ लागला आहे. लाभधारकांची संख्या सध्या घटत असताना मुदत न वाढविताच संख्या कमी केली जात असल्याची शंका व्यक्त करीत डीवायएफआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र कासूकर यांनी विद्यावेतन अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.