शीव-पनवेल महामार्गावरील बसथांब्याची दुरवस्था; प्रवाशांबरोबर एसटीच्या कर्मचाऱ्यांचीही गैरसोय

परजिल्ह्य़ात जाण्यासाठी शीव-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील बसथांब्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची तिजोरी तिकीट भाडय़ाने जरी भरली असली तरी सोयीसुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पैसे मोजूनही सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.

शीव-पनवेल महामार्ग ज्या ठिकाणी संपतो तिथे मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावरील मॅकडोनाल्ड हॉटेल आहे. या ठिकाणावरून केरळ, गोवा, कोकण, सोलापूर, कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्यांसाठी प्रवाशांना वाहतुकीचे खासगी आणि एसटीचादेखील पर्याय आहे. त्यामुळे खासगी गाडय़ांमधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीचे हे लोकप्रिय ठिकाण म्हणूनदेखील ओळखले जाते. राज्य परिवहन महामंडळानेदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी येथे बसथांबा उभारलेला आहे. मात्र या थांब्यावर प्रवाशांच्या सोयीच्या अनुषंगाने एकही सुविधा पुरविण्यात आलेली नाही. या ठिकाणी बसण्याची आसन व्यवस्था नसून महामार्गावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहकांना तिकीटयंत्र चार्ज करण्यासाठी विजेची व्यवस्था, बसण्यासाठीची प्रशस्त चौकीदेखील नसल्याने प्रवाशांबरोबर एसटीच्या कर्मचाऱ्यांचे देखील अतोनात हाल होत असल्याचेच चित्र आहे.

याबाबात पनवेल बसआगाराशी संपर्क साधला असता आगार व्यवस्थापक सुट्टीवर असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ झाला नाही. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची मागणी असल्यास सोय करता येईल, असे सांगितले.

अवैध प्रवासी वाहतूक बिनबोभाट

मुंबईतून निघालेल्या वाहनचालकांना कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील बसथांबा हा मुंबईतील प्रवासी मिळण्याचे शेवटचा थांबा असल्याने या थांब्यावर प्रत्येक बस थांबते. ज्या बसगाडय़ा राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल आगारात जात नाहीत, त्या मॅकडोनाल्ड बसथांब्यावरून थेट प्रवासी घेऊन येथून जातात. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईमध्ये दुध पोहचविण्यासाठी आलेले टँकरही पुन्हा परतीचा प्रवास करताना अवैध प्रवाशांची ने-आण करतात. पनवेल ते पुणे या पल्ल्यासाठी सरकारी तिकीटभाडय़ाचा दर चारशे रुपये असल्यास खासगी वाहने दीडशे ते दोनशे रुपये घेतात. त्यामुळे प्रवाशांना एकाच थांब्यावर खासगी आणि सरकारी प्रवास करण्याची सोय उपलब्ध आहे.

अवैध प्रवासादरम्यान प्रवाशांची होणारी लूटमारीच्या पाश्र्वभूमीवर कळंबोली वाहतूक पोलिसांनी सातत्याने कारवाईचा बडघा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे मागील आठ महिन्यांत १६६ वाहनचालकांवर अवैध प्रवासी वाहतूक केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. मात्र राज्य परिवहन महामंडळाचे भरारी पथक क्वचितच कारवाई करत असल्यामुळे अवैध वाहतूक सुरू आहे.

गोरख पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक पोलीस