विनापरवाना घातक हत्यारे व विदेशी मद्य बाळगून शासकीय कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या सहा जणांना कामोठे पोलिसांनी अटक केली असून तिघे पळून गेले आहेत. यातील दोघे तडीपार होते.

मंगळवारी (१५ जानेवारी) कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर जुई परिसरातील खाडीकिनारी गस्त घालत असताना संशयास्पद रिक्षा जाताना दिसली.

पोलिसांनी थांबविण्यासाठी प्रयत्न केला असता, हिरामण चिमणे या व्यक्तीने खाडीकिनारी बांधलेल्या घराच्या दिशेने ही रिक्षा थांबली. रिक्षातील व्यक्ती घरात गेल्या. घरातून आणखी व्यक्ती बाहेर आल्या. त्यांनी विचारणा करणाऱ्या पोलिसांनाच दमदाटी केली.

पोलिसांनी अधिक बळ मागवल्यानंतर यातील सुनील गोवारी, जयेश गोवारी व हिरामण वाळके झुडपाच्या दिशेने पळून गेले. तर सचिन म्हात्रे, रोशन बोडके, उदय माळी, गणेश वाजे, महेश शिंदे, विलास गोवारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी घटनास्थळी असणाऱ्या इनोव्हा, हुंडाई, होंडा सिटी व रिक्षाची झडती घेतली असता, त्यामध्ये गावठी कट्टा, तलवारी, कोयते, विदेशी बीअर, देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणातील सुनील गोवारी व जयेश गोवारी हे गुंडाप्रवृत्तीचे असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, अग्निशस्त्र जवळ बाळगणे, मारामारी यासारखे गुन्हे नोंद आहेत. दोघांनाही तडीपार करण्यात आले होते, अशी माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांनी दिली.